Thursday, 28 January 2016

नेहरू ,बोस आणि भाजपाचा विलाप ,धनंजय जुन्नरकर सचिव ,मुंबई काँग्रेस



नेहरू ,बो
स आणि भाजपाचा विलाप 

        धनंजय जुन्नरकर , सचिव ,मुंबई काँग्रेस  9930075444


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११९व्या जयंतीला त्यांच्याशी संबंधीत १०० फाइली पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केल्या . त्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्य मंत्री ममता ब्यनार्जी   ह्यांनी सप्टेंबर महिन्यात ६४ फाइली व १२०००कागदपत्रे सार्वजनिक केली होती . चालू वर्षात येणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आपापली रणनीती हे दोन्ही पक्ष आखत आहेत, हे समजायला भारतीय जनता काही दुध खुळी नाही . या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ह्या आधी आपल्या सरकारच्या कारकिर्दीत हा निर्णय का घेतला नाही याचे उत्तर दोघांकडेही नाही . जनमानसाच्या मुख्य मुद्द्यांवरून लक्ष दुसरी कडे वळवावे व आपण आपल्या कामांनी आता निवडून येऊ शकत नाही हा विचार पक्का झाल्याने हे प्रकार सुरु झाले आहेत . दिल्ली , बिहार विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यावर आणि भाजपचे अच्छे दिन संपले हे कळल्यावर पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी भावनेला हात घालण्याच्या आपल्या मूळ तत्वाकडे उडी घेतली . 
स्वातंत्र्य लढयात दूरदूर पर्यंत कोणताही सहभाग नाही ,स्वातंत्रपूर्व लढयातील कोणत्याही महत्वाच्या नेत्याने आर एस एस ची ,हिंदू महासभेची विचार धारा मान्य केली नाही ,त्यामुळे विजयी गाथा ,विजयी ठेवा ,स्मारके किंवा सांगण्या सारखे काही नाही .म्हणून भाजपा  हतबल आहे. स्वतः कडे काही नाही तर विरोधी पक्षाच्या महत्वाच्या लोकांवर खोट्या आरोपाची राळ उडवून द्यायाची हा स्वतःचा जुना उद्योग भाजपाने पुन्हा सुरु केला आहे . काही महिने विरोधी पक्ष -आरोप नाकारण्यात मश्गुल असेल त्यात आपण निवडणुका जिंकून घेऊ अशी रणनीती आहे . पंडित नेहरू -गांधी , नेहरू -पटेल  असे खोटे वाद करून झालेले आहेत , यावेळी  नेहरू -नेताजी बोस असा नवा वाद लावून दयायचे काम त्यांनी चालू केले आहे . नेताजींवर कॉंग्रेस ने अन्याय केला , नेताजींना नेहरू प्रतिस्पर्धी मानत होते ,त्यांच्या घरावर २०वर्षे पाळत ठेवली गेली असे या वेळी केलेले आरोप आहेत . या सर्व आरोपांचे कॉंग्रेस खंडन करते . मुळात नेताजी आणि नेहरू यांच्यावर काही भाष्य करायचे असल्यास, आपल्याला त्यांच्या राजकीय जीवनाच्या महत्वाच्या पैलूंची कठोर समीक्षा करावी लागेल ., नेहरू आणि नेताजींचे स्वातंत्र्या बाबतचे विचार ,लोकशाही बाबतचे विचार ,त्या बाबतचे केलेले कार्य ,धोरणे यांचा प्रामुख्याने विचार करावा लागेल . 
दोन्ही महान नेत्यांचा जन्म सुख संपन्न घरात झाला . शिक्षण चांगल्या प्रकारे झाले . नेहरू नेताजींपेक्षा ८ वर्षाने जेष्ठ होते. त्यामुळे दोघांनाही मिळालेल्या वातावरणात काही विशेष फरक नव्हता . 
नेताजींना सुरवाती पासून भव्य दिव्यतेची आवड होती . वेळोवेळी त्यांनी त्याचे दर्शनही घडवले . ज्याच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नाही अशा ब्रिटीश सरकार विरुध्द सैन्यलढा  देऊन," चलो दिल्ली "चा नारा देणे , १९२८ च्या कॉंग्रेस अधिवेशनात २००० स्वयंसेवकांना सैनिकी पोशाखात गार्ड ऑफ ऑनर चे आयोजन करणे ,कॉंग्रेस च्या ५१व्या  अधिवेशनात ५१सुवासिनी, ५१स्वागताच्या कमानी , ५१बेंडबाजा धारी , ५१बैलांच्या जोड्यांनी खेचणारा रथ यांचे नियोजन केले.  तसाच सोहळा दक्षिण पूर्व आशियात इंडिअन नेशनल आर्मी ,इंडिअन नेशनल लीग चा कारभार हाती घेतानाही केला होता . महात्मा गांधींची अहिंसा वादी वृत्ती ,त्यांची रामराज्य विषयी कल्पना ,आत्मक्लेश करणारी आंदोलने या विषयी त्यांची मते वेगळी होती . त्यामुळे कॉंग्रेसच्या  काही वरिष्ठ नेत्यांची मते त्यांच्याशी पटत नसत. या उलट नेहरूजीचे कुटुंबीय पाश्चिमात्य ,श्रीमंत जीवनशैली जगत  असूनही १९१८ मध्ये गांधीजींच्या संपर्कात आल्यावर सर्व सुखांचा त्याग केला . गांधीजी भारतीय राजकारणात १९१५ मध्ये आले १९१८ पर्यंत म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण देशभर त्यांची ओळख निर्माण व्हायची होती . त्या काळात गांधीजींच्या संपर्कात येऊन नेहरूजी आणि कुटुंबीयांनी सर्व बडेजाव सोडला होता . 
स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस मध्ये जहाल -मवाळ ,डावे -उजवे असे गट होते . नेताजींची विचारसरणी जहाल गटाच्या विचारांशी जुळणारी होती . नेहरुजींची विचारसरणी मवाळ परंतु उदारमतवादी होती . भारतीय राजकीय समस्ये बाबत दोघांची मते समान होती . भारताने ब्रिटीशांशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवू नये ह्यावर दोघांचेही एकमत होते. भारताने ब्रिटीशांकडून वसाहतींचे स्वातंत्र्य स्वीकारु नये असे दोघांचेही मत होते . दोघांची उद्दिष्टे समान होती परंतु मार्ग वेगळे होते . नेताजींच्या  राष्ट्रनिष्ठेविषयी शत्रू सुद्धा शंका घेणार नाही, इतकी ओजस्विता त्यात होती . नेताजी आणि नेहरूजी यांच्या विचारांमध्ये लोकशाही, अर्थ विषयी धोरणे ,स्वातंत्रोत्तर राबविली जाणारी धोरणे यांत प्रचंड तफावत होती . 
नेताजींच्या मते शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही म्हण पक्की होती. जर्मनी व इटली हे ब्रिटनचे शत्रू नेताजींना आपले मित्र वाटत असत. त्यांच्या कार्य प्रणाली प्रमाणे भारतात कारभार चालला पाहिजे असे त्यांना वाटत असे. नेहरूंच्या मते जी राष्ट्रे स्वतःच्या नागरीकांवर अत्याचार करतात ,त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राची गळचेपी करतात त्यांची मदत नको . ब्रिटीशांकडे असलेल्या सर्व वसाहतींमध्ये भारत सर्व अर्थांनी समृद्ध वसाहत होती . त्याचे आकर्षण नाझी राजवटीला देखील होते . १९३१ साली दुसऱ्या गोलमेज परिषदे नंतर गांधीजी रोमच्या पोप यांची भेट घेण्यासाठी थांबले होते . त्यावेळी मुसोलींनीने  गांधींचा मोठा आदर करायचे ठरविले होते. ते स्वतः गांधीजींच्या स्वागताला गेले असता ,गांधींनी त्यांना बजावले ,की "तुम्ही जे करत आहात ते काही क्षणातच पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळणार आहे " . त्यांचा या कृती नंतर त्यांनी गांधीचा नाद सोडून दिला व इतर नेत्यांचा ते शोध घेऊ लागले . १९३३ साली नेताजी जर्मनीला पोहचले असता हिटलर याने, बोस ह्यांची सर्व प्रकारे मदत करावी असे म्हटले होते परंतु ,व्यक्तीशः भेट घेतली नव्हती. एक वंश म्हणून हिटलरचे भारतीय नागरिकांविषयी मत फार घाण होते . त्याच्या "माईन कान्फ "या आत्मचरित्रात तो म्हणतो " इंग्लंड ने त्यांची प्रशासन व्यवस्था हिंदुस्थान च्या हातात दिली किंवा इंग्लंडपेक्षा शक्तिशाली शत्रूने हिंदुस्थान ओढून घेतला तरच इंग्लंडच्या हातातून निसटेल ,अन्यथा नाही. हे वास्तव हिंदुस्थानच्या बंडखोरांच्या कधीच लक्षात येणार नाही. आमचे व इंग्लंडचे संबंध कसेही असोत ,एक जर्मन नागरिक म्हणून मला मनापासून वाटते की हिंदुस्थान इतर कोणत्याही देशाच्या ताब्यात असण्यापेक्षा ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राहिलेला अधिक चांगला ".  अखेरीस २९ मे १९४२ मध्ये 
हिटलर ने नेताजींची भेट घेतली पण, पुढील १५० वर्षे हिंदुस्थान स्वतंत्र होणार नाही हे सांगितले . 
अशा अनेक उदाहरणांनी आपल्याला नेताजी आणि नेहरूजी या महान नेत्यांच्या वैचारीक द्वांद्वा विषयी सांगता येईल . नेताजींना आकर्षण असलेल्या हिटलरच्या नाझी राजवटीने १९३८च्या मे महिन्यात, मुंबईतील जर्मन वकिलातीमार्फत  नेहरूंना म्युनिक मध्ये राहण्यासाठी निमंत्रण दिले तर ते स्विकारतील का ?अशी विचारणा केली होती परंतु नेहरूंनी ती तात्काळ नाकारली होती . तसेच १९३६ मध्ये मुसोलिनीच्या खासगी प्रतिनिधीने मुसोलिनीच्या पत्नीचा मृत्यू झाला असता सांत्वनपर भेटीचे आयोजन करून कुठेही नाव छापून येणार नसल्या बाबतही सुचविले परंतु, नेहरूंनी ती भेट देखील नाकारली होती . म्हणजे नेहरू यांजकडून कोणतेही प्रयत्न होत नसतानाही, दोन्ही हुकुमशहा त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न करत होते . लोकाशाहीच्या विचारांशिवाय इतर कोणताही विचार कॉंग्रेस ला मान्य नव्हता . हुकुमशाही तत्वांना स्वीकारले तर ,आगीतून फोफाट्यात पडणे होईल असे नेहरूंचे मत होते . नेताजींच्या आझाद हिंद सेना व जपानच्या फौजेच्या माध्यमातून  ब्रिटीश सरकारवर विजय मिळवला असता तर ,जपानचे भारता विषयी काय धोरण राहिले असते ह्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही . 
कॉंग्रेस पक्षात गांधींचा शब्द अंतिम असायचा . कोणतेही गट तट असले तरी शेवटी मतैक्य व्हायचे . १९३८साली नेताजीं अध्यक्ष झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग स्थापन केला त्यांनी त्यांचे आर्थिक विचार मांडले . ते विचार गांधीजींच्या विचारांशी सहमत होणारे नव्हते . नेताजींना रशिया सारखे सूत्रबध्द नियोजन ,जड उद्योगांची आवश्यकता ,कुटुंब नियोजन हवे होते . हे मुद्दे वादग्रस्त असल्याचे शरद बाबूंनी त्यांना सुचविले होते . अशा प्रकारे कॉंग्रेस विचारसरणीच्या विरोधात जाणारी व्यक्ती पुन्हा अध्यक्ष बनू नये, असे गांधीजींना वाटले असावे . त्यांना तेव्हा मौलाना आझाद अध्यक्ष हवे होते परंतु आझादांनी त्यावेळी नकार दिला . तरी १९३९च्या निवडणुकीत नेताजींनी गांधीजींच्या उमेदवाराचा बहुमताने पराभव केला . त्या नंतर ही गांधीजीनी आपल्याला सहकार्य करावे असे त्यांना वाटत होते. आधीची कमिटी ही नेताजीनीच नेमलेली होती . नेताजींनी त्यांना तार करून ,कोणत्याही प्रकारे बैठक घेण्याला परवानगी दिली नाही.  तसा आदेश लेखी पाठविला ,त्यामुळे कमिटीला आपला अपमान झाल्याचे वाटले व त्या १५जणांच्या कमिटी पैकी १२ जणांनी एकत्ररित्या राजीनामे दिले . उरलेल्या तीन जणांमध्ये स्वतः नेताजी ,त्यांचे बंधू शरद बाबू ,व नेहरूजी होते . पुढे नेताजींच्या धोरणात बदल होणार नसल्याचे जाणवल्यावर नेहरूंनी देखील राजीनामा दिला . त्यामुळे शेवटी कंटाळून नेताजींनीही राजीनामा देऊन पुढे फोरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली . 
उपरोक्त सर्व बाबी भाजपा आणि आर एस एस विचारसरणी वाले जाणीवपूर्वक विसरतात . नेताजींना हिंदू महासभेत सामील व्हावेसे वाटले नाही हे भाजपाचे शल्य आहे .आझाद हिंद सेना स्थापन झाल्यावर भारतीयांसाठी रेडियोवरून दिलेल्या संदेशात त्यांनी भारतीय जनतेला गांधीजी  आणि नेहरूजी यांच्या सोबत राहण्याचे आवाहन केले होते त्यात त्यांनी हिंदू महासभा किंवा आर एस एस चे नाव घेतले नव्हते . आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेड्ना  गांधीजी,नेहरूजी , मौलाना आझाद ह्यांची नावे दिली होती . नेताजी कॉंग्रेस पासून दूर जावू नये म्हणून नेहरूंनी खूप प्रयत्न केले .  नेताजींनी आपल्या धोरणांच्या विषयी गांधीजींशी व्यापक चर्चा करावी असे नेहरूंनी सुचविले होते . १७एप्रिल १९३९ला नेहरूंनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात नेताजी बोस ह्यांना कॉंग्रेसचा अध्यक्ष स्विकारावे अशी विनंती केली होती . ह्यावरून या दोन्ही महान नेत्यांमध्ये पदावरून कोणतीही स्पर्धा नसल्याचे जाणवते . 
        पुढील काही महत्वाच्या घटनाच्या तारखा आणि वर्ष यांवर नजर टाकल्यास बऱ्याच गोष्टी समजण्यास सोपे जाईल . १सप्टेंबर १९३९ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर दुसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली . १६ जानेवारी १९४१ला ब्रिटीशांच्या हातावर तुरी देऊन नेताजी भारताच्या बाहेर निघून गेले . जून १९४१मध्ये रोम मध्ये तर १३ मे १९४३ला जर्मनीच्या मदतीने टोकियो ला पोहचले . त्यांनी मार्च १९४४ ला आझाद हिंद सेना आणि जपानी सेनेच्या ३ डिव्हिजनच्या मदतीने इम्फाळ वर आक्रमण केले . परंतु अमेरिका आणि इंग्लंड च्या सैन्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही व पराभव स्वीकारावा लागला . २८ एप्रिल १९४५ ला मुसोलिनीची हत्या झाली ,हि हत्या चर्चिल ह्यांनी घडवून आणली असावी अशी त्यावेळी चर्चा होती . दोनच दिवसांनी ३०एप्रिल १९४५ हिटलर ने  आत्महत्या केली . ६ आणि ८ऑगस्ट ला अमेरिकेने जपान वर अणुबॉम्ब टाकला व जपान शरण आला . त्याच बरोबर तेथून काम करणारी आझाद हिंद सेनेची लढाई देखील संपुष्टात आली . इंग्लंड ने जर्मनीतील युध्द गुन्हेगारांविरुध्द " न्युरेंबर्ग "येथे तर जपान मधील  युध्द गुन्हेगारांविरुध्द " टोकियो " येथे खटले भरायचे तत्व त्यांच्या संसदेत पास केले . आझाद हिंद चा "चलो दिल्ली "नारा यशस्वी झाला नाही . त्यांच्या सैनिकांना दिल्लीला कैदी म्हणून आणले गेले हे सर्वात जास्त वेदानादाई होते . ३ नोव्हेंबर १९४५ ला नेहरूंनी," आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिकांना सोडा व देश स्वतंत्र करा ",असा ब्रिटीश सरकारला जोरदार इशारा दिला . सैनिकांच्या बचावार्थ वकिलांची समिती नेमण्यासाठी मदत केली . कॅपटन शहानवाझ ,कॅपटन पी के सहगल ,लेफ्टनंट गुरुबक्षसिंह धिल्लन यांचे खटले चालू झाले तेव्हा नेहरूंनी स्वतः त्यांची बाजू मांडली . 
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूची बातमी १८ऑगस्ट १९४५ला जगाला मिळाली . त्यांच्या या बातमीने दुखः झाले नाही ,रडला नाही असा एकही भारतीय नसेल . १६ जानेवारी १९४१ला भारताच्या बाहेर जाणे ,जर्मनी ,जपान ,व इतर देशांची मदत घेण्याचा निर्णय नेताजींचा  स्वतःचा  होता  . नेहरू त्याला जबाबदार नव्हते . १९४५ मध्ये जेंव्हा नेताजींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यावेळी देश स्वतंत्र व्हायला २ वर्षे बाकी होती . दोन वर्षांनी नक्की स्वातंत्र्य मिळेल हे कुणालाही माहित नव्हते . त्यामुळे कॉंग्रेस चे षडयंत्र वगैरे म्हणणे सगळ्या भाजपच्या शुध्द थापा आहेत . 
नेताजींच्या घरावर २० वर्षे पाळत ठेवली जात होती व गृहमंत्रालयाच्या तशा नोंदी आहेत ,असे नेताजींच्या भाच्याचे अभिजित रॉय याचे म्हणणे असल्याचे समजते . १९४७ ते १९६७ पर्यंत पाळत ठेवली गेली असा त्याचा आरोप आहे . या काळात गृह मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार बघितला जात होता ,तसेच ह्या पाळत ठेवण्याच्या आरोपात देखील काही तथ्य नाही . जनतेच्या माहितीसाठी म्हणून ह्या काळातील गृहमंत्रांची नावे पुढील प्रमाणे आहेत . 
सरदार वल्लभ भाई पटेल  २ सप्टेंबर १९४६ ते १५ डिसेंबर १९५०,
सी राजगोपालचारी  २६डिसेंबर १९५० ते २५ ऑक्टोबर १९५१,
कैलासनाथ काटजू  १९५१ ते १९५५ ,गोविंद वल्लभ पंत १९५५ ते १९६१,
लालबहादूर शास्त्री   ९ जून १९६१ते २९ ऑगस्ट १९६३,
गुलजारीलाल नंदा  २९ऑगस्ट १९६३ते १४नोव्हेम्बर १९६६ ,
यशवंतराव चव्हाण  १४नोव्हेम्बर १९६६ ते २७जून १९७०

ह्यातील गृह मंत्रांच्या नावाकडे नजर टाकल्यास कोणीतरी अशी कामे करेल का असा सवाल जनतेने स्वतःला विचारावा . पंडित नेहरूंचा स्वर्गवास २७ मे १९६४ ला झाला होता ,मग त्यांच्या मृत्यू नंतरही पाळत ठेवावी असे मृत्यू पूर्वी त्यांनी आदेश दिले होते असे भाजपचे म्हणणे आहे काय ? 
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजीपेक्षाही जर कुणी तुरुंगवास भोगला असेल तर ते पंडित नेहरू होते . गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात ६वर्षे १०महिने तर नेहरूंनी ९वर्षे ६महिने तुरुंगवास भोगला .नेहरूंनी इतिहास घडवला व इतिहास लिहिला .नेहरूंनी लिहिलेली पुस्तके  सर्वकालीन वाचनीय आहेत . लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर १९२९, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी १९३४, द डिस्कवरी ऑफ इंडिया १९४६ ह्या पुस्तकांचे आजही तेवढ्याच तन्मयतेने वाचन होते . वयाच्या पंचविशीत बिघडलेल्या पैसेवाल्यांची मुले जे करतात ते नेहरूंनी सुरु केले असते तर त्यांना रोकणारे कुणी होते काय ?ब्रिटीशांची चाकरी ,वकिली ,किंवा काहीही केले असते तर आयुष्यभर बसून खायला मिळेल इतके त्यांच्याकडे होते.  तरी सुखाला लात मारून जाडे भरडे खादीचे कपडे घालून स्वातंत्र्यासाठी लढले . शेतकरी, कामगार ,मागास वर्गीय लोकांच्या प्रगती साठी लढले . मृत्यू पर्यंत हा वसा त्यांनी सोडला नाही . 
नेहरूंच्या मते संघ आणि जनसंघ  ह्या फक्त संघटना नाहीत तर त्या प्रतिगामी ,सनातनी,विचाराने मागास ,उच्च वर्गीय ,उच्च वर्णीय आणि इतिहासाची चाके उलट्या फिरवू पाहणाऱ्या प्रवृत्ती होत्या . ह्या विचारांमुळे भाजपा आणि संघ यांना नेहरू नकोसे आहेत हे काही लपून नाही . नेहरूंच्या लोकशाही वरील आस्थे मुळे १० मार्च १९३८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी ब्रिटीश सरकर वर दबाव आणण्यासाठी चर्चिल यांना दिर्घ संदेश पाठविला होता व भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सुचविले होते . नवी दिल्ली येथील कॅनडाचे उच्च अधिकारी एस्कॉट रीड १९५०मध्ये म्हणाले होते, " नेहरू त्यांच्या देशाचे संस्थापक ,पालक आणि मुक्तिदाते होते ,जॉर्ज वॉशिंगटन,अब्राहम लिंकन ,थिओडोर रूझवेल्ट या तिघांना एकत्र केल्यावर जे काही असेल ते सर्व नेहरू भारतीय राष्ट्रासाठी आहेत . नेहरू आणि त्यांची धर्म निरपेक्ष विचारसरणी भारतात नसती तर आज भारताची अवस्था पाकिस्तानपेक्षा लाचार झाली असती .ऑस्ट्रेलियाचे राजदूत वोल्टर क्रॉकर  यांनी १९६६ मध्ये Nehru : A Contemporary Estimate नेहरू -एक समकालीन परीक्षण यात लिहिले आहे ,ते म्हणतात "माणसात जे सामान्यपण असते किंवा क्षुद्रपणा असतो त्यांचा अंश मात्र ही नसणाऱ्या मोजक्या माणसांपैकी नेहरू होते . आणि जगाच्या इतिहासातील "दया आणि करुणा " यांचा "सत्तेशी मिलाफ" करणाऱ्या अगदी कमी सत्ताधार्यांपैकी ते एक होते ". हे पुस्तक १९६४ ला नेहरूंच्या मृत्यू नंतर दोन वर्षानंतर आलेले आहे . 
नेहरू ,इंदिरा गांधी ,राजीव गांधी ,यांची शक्य तितकी बदनामी करणे ,त्यांच्या नावाच्या योजना बदलणे  किंवा नामांतर करणे ,खोटा प्रचार करून जनमानसात संशय निर्माण करणे ह्या बाबींमुळे मनाला थोडा क्लेश होईल ,परंतु शेवटी भाजप च्या देशासाठी घातक व निरुपयोगी विचारसरणीचा पराभव निश्चित होईल . महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला धर्मनिरपेक्षतेचा जो पाया घालून दिला तो भुसभुशीत करण्याचे काही प्रवृत्तींचे प्रयत्न आहेत पण त्यात त्यांना अपयश येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे .  हेच भारतावरचे संस्कार आहेत . 
  धनंजय जुन्नरकर 
सचिव ,मुंबई काँग्रेस 
9930075444


संदर्भ -
१) Neharu Making of india -M.J.Akbar अनुवाद -करुणा गोखले
२) वेध नेहरू विचार विश्वाचा - संपादन,  किशोर बेडकिहाळ 
३) आझाद हिंद फौजेची कथा - एस ए अय्यर . अनुवाद- म.अ. करंदीकर  
४) नेताजी सुभाष चंद्र बोस - शिशिर कुमार बोस 
५) मानवी हक्कांची ऐतिहासिक वाटचाल ,पुस्तक ०१ यशवंतराव चव्हाण युनिवर्सिटी 

 Displaying FL12_SCI_BOSE_2218896g.jpg