Tuesday 23 February 2016

इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !



इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !
                                                                                                   धनंजय जुन्नरकर 
                                                                                         सचिव , मुंबई काँग्रेस 

चौकट 
राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे सकस वैचारिक  खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात जाऊन विचार करायची गरज आहे . आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही .  राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या "चौथ्या खांबाची 'अवस्था मंडपवाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे .!





"पत्र व्यवसाय हा जरी धंदा असला, तरी पत्रकारांची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे . धंद्याला स्वरूप द्यावे ,पण धर्माचा मात्र धंदा करू नये . जनताजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून ,पत्रकारांच्या लेखणी -लेखणी मधून क्रांतीरसाच्या चिळकांड्या उडाव्यात आणि वृत्तपत्रे ही क्रांतीरसाची कारंजी व्हावीत . जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच खरा पत्रकाराचा धर्म आहे". पत्रकारितेवर आचार्य अत्रे यांचे हे मत होते . 
गेल्या काही दिवसातल्या बातम्या आणि काही इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या एन्करांची (anchor) भाषा पाहिल्यावर अत्रे नक्कीच म्हणाले असते की गेल्या १०,००० वर्षात असे मूर्ख एन्कर पाहिलेले नाहीत . पत्रकार हा बातमी मागची बातमी शोधणारा बुद्धिमान व्यक्ती असतो किंबहुना असला पाहिजे . खोट्या पुड्या सोडून बातम्या तयार करणारा व्यक्ती पत्रकार असू शकत नाही . 

भारतात ७०,००० पेक्षाही अधिक वर्तमान पत्रे ,६९० वाहिन्या आहेत . त्यात ८० वाहिन्या बातम्यांवर आधारित आहेत . भारतात रोज १० कोटी वर्तमान पत्रे विकली जातात.  ह्या मुळे पत्रकारांची जबादारी जास्त वाढते . गेल्या काही महिन्यातील महत्वाच्या विषयांवरच्या बातम्या पहिल्या ,उदा - दादरी कांड ,रोहित वेमुला ,सलमान खानचे  हिट अन्ड रन ,संजय दत्त चे पेरॉल वर बाहेर येणे आणि आत्ताचे जे.एन.यु. प्रकरण ,तर झालेले वार्तांकन आपली वैचारिक भूक भागवत नाही . बातम्या व त्यावर जाणिव पूर्वक घडवून आणलेल्या चर्चा सामान्य लोकांची गरज वाटण्या पेक्षा वाहिन्यांचा किंवा त्या विषयाने ज्यांचा फायदा होईल अशांचा वैयक्तिक अजेंडा वाटतो .  

पत्रकार हा सरकारच्या विरोधातला, निवडून न आलेला जनतेचा प्रतिनिधी असतो ,असे मला वाटते
काही मोठया वाहिन्यांच्या पत्रकारांनी ,त्यांच्या एन्कारांनी आपले सत्व आणि स्वत्व हरवले आहेत असे वाटते . ,किंवा त्या वाहिन्यांच्या मालकांचे हितसंबंध  जपण्याच्या नादात आपण मुळचे पत्रकार आहोत याचा त्यांना विसर पडलेला आहे . त्यांच्या बातम्या आणि चर्चा ह्या बातम्या न वाटता ,गल्ली बोळातल्या सार्वजनिक उत्सवातील मनोरंजना साठी बोलाविलेल्या वाद्यावृंदा प्रमाणे वाटत आहेत . 
जे.एन.यु. प्रकरणात कन्हैय्या कुमारच्या तोंडातून नेघालेले " हमे चाहिये आझादी " हेच वाक्य प्रसारमाध्यमांनी  दाखविले . भुकमरी से ,पुंजीवाद से ,सामंथवाद से ,मनुवाद से ,गरिबी से ही वाक्ये दाखवीली गेली नाही . उलट दुसऱ्या व्हिडियो तील काश्मिरी मुलांनी एबिविपि च्या मुलांच्या घोषणांना चिडून,प्रतीउत्तर देताना दिलेल्या घोषणा जोडून दाखविल्या . ज्या मुलांचा जे.एन.यु. शी संबंध नाही ,त्यांचा संबंध जोडला ,तसेच :वन्दे मातरम बोला ,भारत माता की जय बोला . नाहीतर तुम्ही देश द्रोही अशी ही दमबाजी केली गेली . भारत माता की जय बोललो आणि भारताचा झेंडा हातात घेतला तर कुणालाही देश द्रोही ठरवायचे व मारायचे लायसन्स आपल्याला मिळते  काय ? या वर किती पत्रकारांनी प्रश्न विचारले ,ते समजले नाही . पत्रकार आणि त्यांचे मालक गुप्तपणे आपले व्यावसायिक हीत जपण्यासाठी विशिष्ट विचारसरणी राबवण्यासाठी काम करू लागले ,तर अराजकतेला फुकटचे निमंत्रण आहे . प्रसारमाध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो ,परंतु काही भ्रष्ट लोकांनी ह्या खांबाला पैशाची थैली लटकावली तर हा खांब पैशाच्या दिशेला झुकू लागतो ,हे दृश्य  देशाचे दुर्दैव आहे . 

आरुषी हत्याकांड ,शिनाबोरा हत्याकांड ,२६/११ चा अतिरेकी हल्ला ,अभिनेते ,उद्योगपतींची बिघडलेली मुले ह्यांची हिट अन्ड रन प्रकरणे ,तसेच रोहित वेमुला ,कन्हैय्या कुमार ह्या बाबतीतील वार्तांकन प्रामाणिक तेच्या कसोटीला धरून नव्हते .  आपण बातम्या पाहत आहोत की  सीआयडी ,क्राईम पेट्रोल ,सावधान इंडिया कार्यक्रम पाहात आहोत काही कळत नाही . 
राजाराम मोहन राय ,दादाभाई नौरोजी ,लोकमान्य टिळक ,गोपाल कृष्ण गोखले ,अशा नेत्यांनी साप्ताहिके ,वृत्तपत्र काढली ,जनतेच्या हक्कांसाठी लिहिले . जनतेला नवीन दृष्टी दिली ,त्यांच्यात एकता निर्माण केली . अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले . १९९४ मध्ये युनिसेफ ने युध्द आणि नैसर्गिक विपदेत पिडीतांना मदत करण्यासाठी प्रसार मध्यामांचीच मदत घेतली होती . अमेरिकन लष्कराने इराक युद्धाच्या वेळी केलेल्या अत्याचाराला माध्यमांनीच वाचा फोडली होती . जेसिका लाल ,नितीश कटारा यांचे  खटले  माध्यमांच्या दबावापायी उघडले  गेले  .

आत्ता काही वाहिन्यांनी देशभक्तीच्या नावाने धुमाकूळ घातला आहे . परंतु त्यांनी केलेल्या चुका व अप्रामाणिक पणामुळे त्यांच्या वर पुन्हा विश्वास ठेवायची हिम्मत होत नाही . २४ तास काय दाखवायचे ह्यामुळे व टिआरपी च्या रेट्या पायी अतिरंजित पणा व उत्सवीपणा ,नाटकीपणा  वाढत चालला आहे . चर्चेसाठी समोर बसलेले प्रवक्ते ,तज्ञ ,पाहुणे ह्यांचातला आणि एन्कर मधला संवाद हा नळावरच्या भांडणासारखा वाटतो . चर्चा करताना एन्कर ने असे प्रश्न मांडावेत जेणेकरून  आपोआप अशी उत्तरे मिळतील की लोकांना आपले मत तयार करता येईल . 

काही एन्कर स्वतःला न्यायमूर्ती समजतात व आपल्या समोर बसलेले प्रवक्ते हे बलात्कारी ,खंडणीखोर ,पाकीटमार असावेत अशा रितीने  प्रवक्त्यांच्यावर ओरडतात . 
हिंदू शास्त्राच्या संकेतानुसार माणसाच्या पाप पुण्याचा हिशेब चित्रगुप्ताच्या वहीत लिहिलेला असतो . त्याच्यावर त्याचे स्वर्ग किंवा नरकात जाणे ठरते . हिंदी मराठीतल्या काही वाहिन्या ,तशा प्रकारे प्रवक्त्यांवर ओरडत असतात व "बघा पडद्यावर " लोक तुमच्या साठी काय म्हणतात,असे म्हणून त्यांची  उलट तपासणी घेत असतात  . 

राष्ट्रीय वाहिन्या म्हणून ज्या वाहिन्या आहेत त्यांना राष्ट्रीय वाहिन्या का म्हणावे ,हे समजत नाही . मोठ्या  उद्योगपतींचे पाठबळ आहे ,देशभर पत्रकार नेमता येतात . त्यांना पगार देता येतो.  म्हणून त्या वाहिन्या राष्ट्रीय आहेत .? की , राष्ट्रीय प्रगतीसाठी ,राष्ट्राच्या एकतेसाठी , जनताभिमुख पत्रकारिता करतात ,म्हणून  त्यांना राष्ट्रीय म्हणावयाचे हा यक्ष प्रश्न आहे .चार तासाच्या पावसाने शहर तुंबले तर २४ तास बातम्या देणारे पत्रकार मात्र ,एक महिला १० किलोमीटरहून पाणी आणते हि बातमी २० सेकंद ही दाखवत नाही . २६/११  च्या हल्ल्यात हॉटेल ताज वरचे वृत्तांकन ६० तास चालले ,परंतु सीएसटी स्टेशन वरच्या हल्ल्याच्या बातम्या किती वेळ दाखविल्या गेल्या ? ताज मध्ये पैसेवाल्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न होता ,सीएसटी स्टेशन वर मरणारे तर ,तुमच्या आमच्या सारखे सामान्य होते . आपल्या जगण्या मरण्याला काय टिआरपी मिळणार ?

राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे वैचारिक सकस खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात विचार करायची गरज आहे . 
आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही . राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या चौथ्या खांबाची अवस्था मंडप वाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे . 

धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस 
सदस्य ,प्रसार माध्यम समिती ,मुंबई काँग्रेस 

Friday 12 February 2016

महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व धनंजय जुन्नरकर MAHILANCHE DEVDARSHAN AANI BEGADI PUROGAMITV


महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व 
धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव  चव्हाण विद्यापीठ ,नाशिक 
                                                                                                                                                                 djunnarkar74@gmail.com



चौकट 
शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरीपाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही ,हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे . देव आणि महिला यांच्यात तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?
***************************************************************************************************************************************************************************************************************


                                        हाजी अली आणि शनि शिंगणापूर ही  धार्मिक स्थाने सध्या वादाची आणि मुलभूत अधिकारांच्या कक्षा रुंदावण्याच्या चर्चेची केंद्र बनलेली आहेत . ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या धर्माची आहेत परंतु,महिलांना प्रतिबंध करण्याच्या बाबतीत समान आहेत .हाजी अली दर्ग्यात गेली कित्येक वर्ष दर्ग्यातील कबरीला हात लावून महिला प्रार्थना करू शकत होत्या . परंतु,२०१२ पासून दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे . शनि देवस्थानच्या विश्वस्त मंडळानेही महिलांना चौथऱ्यावर जायला बंदी केली आहे . दोन्ही धर्माच्या महिला याविरुध्द आंदोलन आणि कोर्ट कचेऱ्या करत आहेत . केरळच्या शबरिमल देवस्थानाचे प्रकरण असेच असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे . त्यामुळे कनिष्ठ न्यायालयांनी देखील आपला निर्णय दिलेला नाही . 
                                   धर्म आणि त्या संबंधी वाद हे, एक प्रकारचे" आग्या मोहोळ " असते, अशी जगातल्या सर्व राजकीय पक्षांची धारणा असते . जे राजकीय पक्ष फक्त धर्म केंद्रित राजकारण करतात ते ह्याला अपवाद आहेत . ते याच्यातून आपला फायदा तपासत असतात . राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी यावर स्वातंत्र्यापूर्वी वाद झडत होते . धर्माचे अवडंबर न माजविणे आणि सामाजिक सुधारणांना गती देणे, हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे . लोकांच्या सारासार बुद्धीला तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टीचे कोंदण चढविणे गरजेचे आहे . 
              " यत्र नार्यस्तु पुजयन्ते ,रमन्ते तत्र देवता - अर्थात नारीला जेथे  पूजनीय मानली जाते -तिचा सन्मान केला जातो, तेथे देव निवास करतात . मग जेथे देव निवास करतात तेथेच आपण नारीला जाऊ देणार नसू ,तर मग ही उक्ती खोटी आहे असे म्हणावे लागेल किंवा मग तसे वागावे तरी लागेल . 
  शनि शिंगणापूरच्या दर्शनाच्या महिला प्रवेश बंदीची परंपरा ४०० वर्षांची ,केरळच्या शबरिमल देवस्थानाची परंपरा ५०० वर्षांची ,हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी नाकारण्याची परंपरा २०१२ पासून आहे . अशा परंपरांचा अभिमान बाळगायचा की त्यात सुधारणा करायची हा महत्वाचा प्रश्न आहे . 
  वर्ण व्यवस्था ,वर्ग व्यवस्था यावर स्वातंत्र्यपूर्वी आणि त्या नंतरही चर्चा आंदोलने चालू आहेत . जाती भेद मानून स्वतःच्या अपत्यांना "ओनर किलिंग "च्या नावाने मारून टाकायचे ,  असे आदेश देणाऱ्या अनधिकृत जात पंचायती ,खाप पंचायती चालवायच्या, हे आपण अजूनही पाहत आहोत . 
  ताजमहल मधील मुमताजची कबर ,फतेहपुर सलीम चिश्ती  दर्गा ,नागपूर येथील ताजुद्दीन बाबा दर्गा व अजमेर शरीफ दर्ग्यात महिला" मझार "पर्यंत जाऊ शकतात . पण २०१२ च्या हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाच्या फतव्या पासून महिला हाजी अली यांच्या दर्ग्यात मझारी पर्यंत जाऊ शकत नाहीत . हे भेद आपण का पाळायचे ?असे महिलांना वाटले असल्यास नवल नाही . जगातले सर्व धर्म गुरु महिलांच्या हक्कांच्या विरुध्द एक असतात हे वारंवार दिसलेले आहे . पद्मश्री ,पद्म भूषण किंवा तत्सम सन्मान मिळविणारे साहित्यीक अशा धार्मिक वादांवर सहसा लिहित नाहीत . कशाला उगाच वाकड्यात शिरा ?असा त्यांचा आविर्भाव असतो . काही विद्वान लोक स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे असे दर्शविणारे तर काही पंडित ,अगदी त्याच्या विरुध्द विचाराचे श्लोक पुरावा म्हणून दाखवतात . टि आर पी च्या नादी लागलेली दृश्य प्रसार माध्यमे १०० वेळा ब्रेक घेऊन प्रश्नाच्या चर्चेचा पार चोथा करून टाकतात .उथळ चर्चा करण्यापेक्षा खोलात जाऊन चर्चा करायची कोणाचीच इच्छा नाही . 
                                         हिंदू धर्मातील जुनाट पुराणवादी रूढी , परंपरा बदलण्यासाठी राजाराम मोहन रॉय ,महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य वेचले . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्माचा त्याग केला . बरीच आंदोलने ,लढा , दिल्या नंतर अनेक सुधारणा झाल्या . १९२९ चा बाल विवाह विरोधी कायदा ,१९६१हुंडा प्रतिबंध कायदा ,१९६९ घटस्फोट कायदा ,१९८७ सती प्रथे विरुध्द कायदा ,१९९४ लिंग निदान प्रतिबंध कायदा आपण केला . देवदासी प्रथा ,विशेष विवाह ,असे कायदे वेद ,शास्त्र ,पुराणात लिहिले होते काय ?मंदिर ,मस्जीत मध्ये लाउड स्पीकर लावा ,असे भगवद गीतेत किंवा पवित्र कुरआन याच्यात लिहिले आहे काय ?समुद्र ओलांडायचा नाही असे, जवळ -जवळ पूर्वीच्या सगळ्यांनी सांगितले आहे . तर मग आता कोणत्या धर्मातील लोक समुद्र पार करत नाहीत ? 
                         पुरुषसत्ताक विचार आणि धर्म मार्तंडांनी महिलांना मतदानाचा अधिकारही नाकारला होता . निरनिराळ्या देशातील महिलांनी या साठी प्रचंड लढा दिला ,तेंव्हा हा अधिकार मिळाला . १८९३ ला न्यूझीलंड ने ,१९१८ मध्ये इंग्लंड ने १९२० मध्ये अमेरिकेने तर सौदी अरब च्या शाह अब्दुल्ला ह्यांनी २०११ला महिलांना मतदानाचा तर २०१५ ला निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला . 
हिंदू संस्कृतीचे अवलोकन केले असता ब्रम्हा ,विष्णु , महेश हे सृष्टीचे रचेते आहेत .अत्री ऋषी यांच्या पत्नी अनुसूया माता ह्यांनी आपल्या तपोबलाने ह्या तिन्ही देवांचे  बाळांमध्ये  रुपांतर केले होते . सृष्टीच्या रचेत्यांचे महिला ,जर बाळ बनवू शकत असतील तर इतर देवांचे दर्शन घ्यायला स्त्रियांना कोण कशी काय बंदी घालू शकेल ? 
                                         भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्म निरपेक्ष व लोकशाही गणराज्य हे शब्द आहेत . सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयातून राज्य घटनेच्या सरनाम्याचे महत्व सांगितले आहे . ह्यात सामाजीक ,आर्थिक आणि राजनैतिक विचार अभिव्यक्ती ,विश्वास ,श्रद्धा व उपासना ह्याचे स्वातंत्र्य आहे . भारत सरकार व राज्य सरकारला जे अधिकार प्राप्त आहेत ते लोकांपासून मिळालेले अधिकार आहेत . त्यात महिलांचाही समान सहभाग आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम १४ हे समानता तर कलम १५ नुसार धर्म,वंश ,जात ,लिंग ,जन्म स्थान ह्यावरून कोणतेही भेदभाव होणार नाही ,हे दर्शविलेले आहे .मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम २ मध्ये ह्याच बाबी सांगितलेल्या आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम २५ नुसार समानतेने सारासार विचार करायचे आणि पेशा आचारण्याचे -धर्म प्रसाराचे स्वातंत्र्य आहे . मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम १४ आणि १८ नुसार देखील हेच सांगितले आहे . धर्माद्वारे भेद भाव करण्याचे  अधिकार कोणालाच नाहीत . " जेंव्हा एखाद्या ऐतिहासिक कारणांनी "संधी बाबत प्रचंड असमानता" निर्माण होते ,तेंव्हा अंतिम ध्येया पर्यंत समानता पोहोचविण्यासाठी " न्याय्य भेद " म्हणजेच पॉजीटिव्ह डिसक्रीमिनिशेन किंवा विश्वास दर्शक कृती केली जाऊ शकते . आंतर राष्ट्रीय कायद्याच्या हक्कांमध्ये " विशेष ऊपाय " केले जाऊ शकतात . "
                                         राजकीय पक्ष , धार्मिक गुरु ह्यांच्यापेक्षाही मानव म्हणून मिळालेले अधिकार सर्व श्रेष्ठ आहेत . त्यामुळे मानव म्हणून महिलांच्या अधिकारांचे महत्व जास्त आहे . हिंदू संस्कृतीत अहिल्या ,द्रौपदी ,सीता ,तारा ,मंदोदरी  ह्या पाच पतिव्रता होत्या . त्यांच्या स्मरणाने देखील पाप मुक्त होतो ,असे श्लोक दर्शवितात . शेवटी त्यांनाही पुरुष सत्ताक पद्धतीतच राहावे लागले असा इतिहास आहे . जेथे ह्या महान स्त्रियांना अग्नी परीक्षा चुकली नाही तेथे सामान्य महिलांना कसे काय अधिकार मिळणार ?
असे म्हणतात की , ५० वर्षानंतर भोजनात बदल करायला हवा ,
                         १००  वर्षानंतर घर पाडायला हवे ,
                        ५००  वर्षानंतर देऊळ पाडायला हवे ,
                        १०००  वर्षानंतर धर्माला काडी लावायला हवी !
अर्थात , ५०  वर्षानंतर माणसाची पचन व्यवस्था कमकुवत होते ,१००  वर्षानंतर घर व ५०० वर्षानंतर देऊळ जीर्ण होते ,त्यांचा जीर्ण उध्दार करावा लागतो . १०००  वर्षानंतर धर्मात नकारात्मक बाबींचा अंतर्भाव होतो , त्यातल्या निरुपयोगी रूढी -परंपरा रुपी कचरा जाळून टाकायला हवा असे म्हटले गेले आहे . असे केल्यास सर्व बाबींचा आपण नव्याने आनंद घेऊ शकू व एक सुसंस्कृत समाज आपल्याला  स्थापन करता येईल  . 

                                शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरी पाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे  . देव आणि महिला यांच्यात ,तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?

धनंजय जुन्नरकर 
सचिव , मुंबई काँग्रेस ,
पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव चव्हाण विद्यापीठ ,नाशिक