Friday, 25 December 2015

नॅशनल हेराॅल्ड ,यंग इंडिया आणि स्वामी (अ)समर्थ !!



नॅशनल हेराॅल्ड ,यंग इंडिया आणि स्वामी (अ)समर्थ  !!
                                                        धनंजय जुन्नरकर 
                  मुंबई काँग्रेस सचिव , प्रसार माध्यम समिती समन्वयक

                                                                          9930075444


चौकट 

 एकाच कुटुंबातील संस्था त्याच कुटुंबात राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय ,अशी टीका नॅशनल हेराॅल्ड ,यंग इंडिया यावर होऊ शकते . परंतु उद्या शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना अथवा आर एस एस चे मुखपत्र जर,आर्थिक कारणांनी अडचणीत येत असेल तर, त्या पक्षाचे नेते त्या संस्था वाचवतील की दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांची वाट पाहतील ? हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारावा .  बोफोर्स ,परदेशी मूळ ,स्वीसखाते ,द्वी नागरिकत्व ,खोटी पदवी ,असे सर्व आरोप निकामी झाल्यावर, राजकारणात  रोज सकाळी तोंडी लावण्या पुरते तरी काही असावे ,या हेतूने नॅशनल हेराॅल्ड प्रकरणाला खमंग फोडणी देण्याचा प्रकार चालू आहे . पण स्वामिना यातही उपासाच घडेल यात शंका नाही !






देशात सध्या लोकसभा राज्यसभा आणि राज्यात विधानसभेचे अधिवेशन चालू आहे . वाढती असहिष्णुता आणि बिहार राज्यात झालेला पराभव मोदी सरकारच्या जिव्हारी लागलेला आहे . आपण दिलेली अवास्तव आश्वासने पाळता येत नसल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविणे या एकमेव कारणासाठी मोदी सरकारने सुडाचे राजकारण सुरु केले आहे . नॅशनल हेराॅल्ड हे त्यापैकीच एक प्रकरण . नॅशनल हेराॅल्ड वरून सध्या वातावरण तापले आहे . 
नॅशनल हेराॅल्ड नक्की काय आहे याची बऱ्याच जणांना काहीही माहिती नाही . 
नॅशनल हेराॅल्ड चा जन्म भाजपाच्या जन्माच्या  बेचाळीस वर्षे (१९८०)आधी म्हणजे ९ सप्टेंबर १९३८ ला झाला . 
काँग्रेस चे जेष्ठ नेते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असोशीएटेड  जर्नल लिमिटेड या संस्थेची स्थापना केली .ब्रिटीशांच्या जुलूम आणि दडपशाहीला वाचा फोडण्यासाठी आपले विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी एका दैनिकाची गरज होती  त्यातूनच पुढे नॅशनल हेराॅल्ड या दैनिकाची स्थापना केली गेली. सेवाभाव आणि पैसे न कमाविणे या उद्देशा मुळे ही संस्था जन्मापासूनच तोटयात चालविली गेली . कर्जबाजारीपणा मुळे १९९८ मध्ये वृत्तपत्राचे लखनौ येथील काम बंद करण्यात आले . न्यायालयीन आदेशानुसार कर्ज व देणी देण्याकरता काही मालमत्ता विकण्यात आली . २००८ मध्ये दिल्लीची आवृत्तीही याच कारणांनी बंद झाली . २०१० साली सॅम पित्रोदा आणि वरिष्ठ पत्रकार सुमन दुबे ह्यांच्या माध्यमातून यंग इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली . दरम्यान असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )चे कर्ज वाढतच गेले.  
असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )ही संस्था काँग्रेस चे मुखपत्र चालवत असल्याने पक्षा कडून त्यांना वेळोवेळी बिनव्याजी आर्थिक मदत दिली गेली . पंडित जवाहरलाल नेहरू  यांचे नाव सदर संस्थेशी जोडले गेले होते व स्वातंत्र्य लढ्याच्या  आठवणी याच्याशी निगडीत असल्याने तसेच यंग इंडिया ही संस्था देखील काँग्रेस पक्षाची असल्याने वेळोवेळी मदत केली गेली . आर्थिक अवस्था खस्ता होणाऱ्या या संस्थेला ९० कोटी ची गरज होती ,यंग इंडिया च्या माध्यमातून ही गरज देखील भागविण्यात आली  .असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )ने आपले समभाग यंग इंडिया ला दिले ,त्याबदल्यात वेगळे ५० लाख रुपये .असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )ला देण्यात आले . या व्यवहारा नंतर .असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )ही संस्था यंग इंडिया संस्थेची सहकारी किंवा उपसंस्था बनली . एकाच कुटुंबातील संस्था त्याच कुटुंबात राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय अशी टीका यावर होऊ शकते . परंतु उद्या शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना अथवा आर एस एस चे मुखपत्र जर,आर्थिक कारणांनी अडचणीत येत असेल तर, त्या पक्षाचे नेते त्या संस्था वाचवतील की दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांची वाट पाहतील ? हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारावा . 
काँग्रेस पक्षाचे खजिनदार मोतीलाल व्होरा हे ,ह्या दोन्ही संस्थांच्या समितीवर आहेत . यंग इंडिया  ह्या संस्थेचे प्रत्येकी ३८  टक्के समभाग आहेत . काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या संस्थामध्ये त्यांच्याच लोकांच्या नाहीतर काय भाजपच्या लोकांच्या नावाने समभाग ठेवायचे ? या दोन्ही संस्था चालविणारे पदाधिकारी कोणताही लाभ घेत नाही . असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )चे समभाग यंग इंडिया कडे आले असले तरी त्यांच्या नावे असलेली कथीत दोन हजार रुपयांची मालमत्ता अजूनही त्यांच्याच नावाने आहे . त्यांच्यावर यंग इंडिया चे नाव नाही . देशसेवेला वाहून घेणाऱ्या आणि आर्थिक आपत्तीत सापडलेल्या .असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल ) ला आपली काही मालमत्ता १९९८ साली विकावी लागली तेंव्हाही तिला वाचवायला कुणी आले नाही . अजूनही ही संस्था मालमत्ता विकत बसली व कर्ज फेडत बसली तर संस्थेकडे काहीच वाचणार नाही . 
सुब्रमण्यम स्वामी यांच्या विषयी जास्त काही लिहिण्या बोलण्यात अर्थ नाही . गांधी घराण्याशी  प्रचंड हाडवैर , त्यामुळे आरोप करणे ,याचिका करणे याच्या शिवाय  त्यांच्या कडे काही काम असावे असे वाटत नाही .नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी त्यांची राहती घरेही राष्ट्राला अर्पण केली होती . स्वतःचे पूर्ण आयुष्य व पैसा देशासाठी खर्च केला . ऐषारामी जिवन जगता आले असते ते सोडून ते जेल मध्ये गेले . त्यांनी काढलेली संस्था वाचवावी असे पक्षाला वाटले तर काय चूक केली ? स्वामींनी मध्यंतरी राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीच्या विरोधात मोदी सरकारला न्यायालयात खेचण्याच्या बाता केल्या होत्या त्याचे पुढे काय झाले ? 
हा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा जेष्ठ विधी तज्ञ शांतीभूषण  ह्यांनी असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )चे ३०० समभाग आपल्या वडिलांच्या नावे असून आपण काँग्रेस ला धडा शिकविण्याची आरोळी ठोकली आहे .शांतीभूषण ह्यांनी, त्यांच्या वडिलांनी ज्या संस्थेचे ३०० समभाग खरेदी केले व देशसेवेला हातभार लावला ,त्या संस्थेला वाचविण्याचा काही प्रयत्न का नाही केला ?  ह्यांचा इतिहासही कॉंग्रेसच्या विरोधातच आहे . १९७१च्या रायबरेली लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव पचवू न शकणाऱ्या राज नारायण ह्यांनी इंदिरा गांधी ह्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल केला होता . अलाहाबाद उच्च न्यायालयात हा खटला चालला त्यावेळी राजनारायण यांचे वकील होते शांती भूषण . इंदिरा गांधींची पाच तास चौकशी चालली त्यातील चार तास वीस मिनिटे चौकशी याच शांती भूषण ह्यांनी केली होती . त्याचे बक्षीस त्यांना लगेचच मोरारजी सरकारने कायदे मंत्री बनवून केले होते . अशी सगळी विघ्नसंतोषी माणसे एकत्र येऊन काही चांगले घडवतील अशी अपेक्षा नाही . 
असोशीएटेड  जर्नल लिमिटेड ( ए जी एल )च्या चौकशीत काहीच आढळले नाही म्हणून १७ ऑगस्ट २०१५ मध्ये अंमल बजावणी संचनालयाने ही केस बंद केली होती . केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात ही केस पुन्हा चालू केली . मुख्यमंत्री वीरभद्र सिंघ ह्यांच्या घरावर त्यांच्या मुलीचे लग्न चालू असताना धाड घातली गेली . अरुण शौरी ,चिदम्बरम ,यांनाही असाच त्रास देणे चालू आहे . भाजपा वगळता इतर पक्षाच्या मुख्यमंत्रांचे जाणीवपूर्वक अपमान केले जात आहेत . ह्या सुडाच्या राजकारणाच्या विरुध्द आवाज उचलायला काही माध्यमांची देखील ताकद नाही हे पाहणे लोकांच्या नशीबी आले आहे . 
हे सर्व पाहिल्यावर नॅशनल हेराॅल्ड च्या  घोषवाक्याची महती पटल्या वाचून राहत नाही . ते म्हणतात " फ्रीडम इज पेरील ,डिफेंड इट विथ ऑल युवर माईट ". अर्थात  " स्वातंत्र्य संकटात आहे ,सर्व शक्तीनिशी त्याचे रक्षण करा "  ! 

धनंजय जुन्नरकर 
मुंबई काँग्रेस सचिव , प्रसार माध्यम समिती समन्वयक 
९९३००७५४४४

No comments:

Post a Comment