इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि त्यांचा घसरता दर्जा !
धनंजय जुन्नरकर
सचिव , मुंबई काँग्रेस
चौकट
राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे सकस वैचारिक खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात जाऊन विचार करायची गरज आहे . आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही . राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या "चौथ्या खांबाची 'अवस्था मंडपवाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे .!
गेल्या काही दिवसातल्या बातम्या आणि काही इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या एन्करांची ( anchor) भाषा पाहिल्यावर अत्रे नक्कीच म्हणाले असते की गेल्या १०,००० वर्षात असे मूर्ख एन्कर पाहिलेले नाहीत . पत्रकार हा बातमी मागची बातमी शोधणारा बुद्धिमान व्यक्ती असतो किंबहुना असला पाहिजे . खोट्या पुड्या सोडून बातम्या तयार करणारा व्यक्ती पत्रकार असू शकत नाही .
भारतात ७०,००० पेक्षाही अधिक वर्तमान पत्रे ,६९० वाहिन्या आहेत . त्यात ८० वाहिन्या बातम्यांवर आधारित आहेत . भारतात रोज १० कोटी वर्तमान पत्रे विकली जातात. ह्या मुळे पत्रकारांची जबादारी जास्त वाढते . गेल्या काही महिन्यातील महत्वाच्या विषयांवरच्या बातम्या पहिल्या ,उदा - दादरी कांड ,रोहित वेमुला ,सलमान खानचे हिट अन्ड रन ,संजय दत्त चे पेरॉल वर बाहेर येणे आणि आत्ताचे जे.एन.यु. प्रकरण ,तर झालेले वार्तांकन आपली वैचारिक भूक भागवत नाही . बातम्या व त्यावर जाणिव पूर्वक घडवून आणलेल्या चर्चा सामान्य लोकांची गरज वाटण्या पेक्षा वाहिन्यांचा किंवा त्या विषयाने ज्यांचा फायदा होईल अशांचा वैयक्तिक अजेंडा वाटतो .
पत्रकार हा सरकारच्या विरोधातला, निवडून न आलेला जनतेचा प्रतिनिधी असतो ,असे मला वाटते
काही मोठया वाहिन्यांच्या पत्रकारांनी ,त्यांच्या एन्कारांनी आपले सत्व आणि स्वत्व हरवले आहेत असे वाटते . ,किंवा त्या वाहिन्यांच्या मालकांचे हितसंबंध जपण्याच्या नादात आपण मुळचे पत्रकार आहोत याचा त्यांना विसर पडलेला आहे . त्यांच्या बातम्या आणि चर्चा ह्या बातम्या न वाटता ,गल्ली बोळातल्या सार्वजनिक उत्सवातील मनोरंजना साठी बोलाविलेल्या वाद्यावृंदा प्रमाणे वाटत आहेत .
जे.एन.यु. प्रकरणात कन्हैय्या कुमारच्या तोंडातून नेघालेले " हमे चाहिये आझादी " हेच वाक्य प्रसारमाध्यमांनी दाखविले . भुकमरी से ,पुंजीवाद से ,सामंथवाद से ,मनुवाद से ,गरिबी से ही वाक्ये दाखवीली गेली नाही . उलट दुसऱ्या व्हिडियो तील काश्मिरी मुलांनी एबिविपि च्या मुलांच्या घोषणांना चिडून,प्रतीउत्तर देताना दिलेल्या घोषणा जोडून दाखविल्या . ज्या मुलांचा जे.एन.यु. शी संबंध नाही ,त्यांचा संबंध जोडला ,तसेच :वन्दे मातरम बोला ,भारत माता की जय बोला . नाहीतर तुम्ही देश द्रोही अशी ही दमबाजी केली गेली . भारत माता की जय बोललो आणि भारताचा झेंडा हातात घेतला तर कुणालाही देश द्रोही ठरवायचे व मारायचे लायसन्स आपल्याला मिळते काय ? या वर किती पत्रकारांनी प्रश्न विचारले ,ते समजले नाही . पत्रकार आणि त्यांचे मालक गुप्तपणे आपले व्यावसायिक हीत जपण्यासाठी विशिष्ट विचारसरणी राबवण्यासाठी काम करू लागले ,तर अराजकतेला फुकटचे निमंत्रण आहे . प्रसारमाध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो ,परंतु काही भ्रष्ट लोकांनी ह्या खांबाला पैशाची थैली लटकावली तर हा खांब पैशाच्या दिशेला झुकू लागतो ,हे दृश्य देशाचे दुर्दैव आहे .
आरुषी हत्याकांड ,शिनाबोरा हत्याकांड ,२६/११ चा अतिरेकी हल्ला ,अभिनेते ,उद्योगपतींची बिघडलेली मुले ह्यांची हिट अन्ड रन प्रकरणे ,तसेच रोहित वेमुला ,कन्हैय्या कुमार ह्या बाबतीतील वार्तांकन प्रामाणिक तेच्या कसोटीला धरून नव्हते . आपण बातम्या पाहत आहोत की सीआयडी ,क्राईम पेट्रोल ,सावधान इंडिया कार्यक्रम पाहात आहोत काही कळत नाही .
राजाराम मोहन राय ,दादाभाई नौरोजी ,लोकमान्य टिळक ,गोपाल कृष्ण गोखले ,अशा नेत्यांनी साप्ताहिके ,वृत्तपत्र काढली ,जनतेच्या हक्कांसाठी लिहिले . जनतेला नवीन दृष्टी दिली ,त्यांच्यात एकता निर्माण केली . अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले . १९९४ मध्ये युनिसेफ ने युध्द आणि नैसर्गिक विपदेत पिडीतांना मदत करण्यासाठी प्रसार मध्यामांचीच मदत घेतली होती . अमेरिकन लष्कराने इराक युद्धाच्या वेळी केलेल्या अत्याचाराला माध्यमांनीच वाचा फोडली होती . जेसिका लाल ,नितीश कटारा यांचे खटले माध्यमांच्या दबावापायी उघडले गेले .
आत्ता काही वाहिन्यांनी देशभक्तीच्या नावाने धुमाकूळ घातला आहे . परंतु त्यांनी केलेल्या चुका व अप्रामाणिक पणामुळे त्यांच्या वर पुन्हा विश्वास ठेवायची हिम्मत होत नाही . २४ तास काय दाखवायचे ह्यामुळे व टिआरपी च्या रेट्या पायी अतिरंजित पणा व उत्सवीपणा ,नाटकीपणा वाढत चालला आहे . चर्चेसाठी समोर बसलेले प्रवक्ते ,तज्ञ ,पाहुणे ह्यांचातला आणि एन्कर मधला संवाद हा नळावरच्या भांडणासारखा वाटतो . चर्चा करताना एन्कर ने असे प्रश्न मांडावेत जेणेकरून आपोआप अशी उत्तरे मिळतील की लोकांना आपले मत तयार करता येईल .
काही एन्कर स्वतःला न्यायमूर्ती समजतात व आपल्या समोर बसलेले प्रवक्ते हे बलात्कारी ,खंडणीखोर ,पाकीटमार असावेत अशा रितीने प्रवक्त्यांच्यावर ओरडतात .
हिंदू शास्त्राच्या संकेतानुसार माणसाच्या पाप पुण्याचा हिशेब चित्रगुप्ताच्या वहीत लिहिलेला असतो . त्याच्यावर त्याचे स्वर्ग किंवा नरकात जाणे ठरते . हिंदी मराठीतल्या काही वाहिन्या ,तशा प्रकारे प्रवक्त्यांवर ओरडत असतात व "बघा पडद्यावर " लोक तुमच्या साठी काय म्हणतात,असे म्हणून त्यांची उलट तपासणी घेत असतात .
राष्ट्रीय वाहिन्या म्हणून ज्या वाहिन्या आहेत त्यांना राष्ट्रीय वाहिन्या का म्हणावे ,हे समजत नाही . मोठ्या उद्योगपतींचे पाठबळ आहे ,देशभर पत्रकार नेमता येतात . त्यांना पगार देता येतो. म्हणून त्या वाहिन्या राष्ट्रीय आहेत .? की , राष्ट्रीय प्रगतीसाठी ,राष्ट्राच्या एकतेसाठी , जनताभिमुख पत्रकारिता करतात ,म्हणून त्यांना राष्ट्रीय म्हणावयाचे हा यक्ष प्रश्न आहे .चार तासाच्या पावसाने शहर तुंबले तर २४ तास बातम्या देणारे पत्रकार मात्र ,एक महिला १० किलोमीटरहून पाणी आणते हि बातमी २० सेकंद ही दाखवत नाही . २६/११ च्या हल्ल्यात हॉटेल ताज वरचे वृत्तांकन ६० तास चालले ,परंतु सीएसटी स्टेशन वरच्या हल्ल्याच्या बातम्या किती वेळ दाखविल्या गेल्या ? ताज मध्ये पैसेवाल्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न होता ,सीएसटी स्टेशन वर मरणारे तर ,तुमच्या आमच्या सारखे सामान्य होते . आपल्या जगण्या मरण्याला काय टिआरपी मिळणार ?
राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्या ,चर्चा ,त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न ,त्यातून मिळणारे वैचारिक सकस खाद्य ,एन्कर व त्यांचे वर्तन ह्या विषयी खोलात ,तपशीलात विचार करायची गरज आहे .
आत्ता पर्यंतचा अनुभव फार चांगला नाही . राष्ट्रीय व राज्यीय वाहिन्यांच्या प्राईम टाईम मध्ये होणाऱ्या चर्चेत ,"मुद्द्याची लिंक लागायला लागली की ते ब्रेक घेतात " , की " लिंक लागूच नये म्हणून ब्रेक घेतात " हे न उलगडणारे कोडे आहे . ह्या वाहिन्यांच्या सुधारणेला खूप वाव आहे . पण , त्यांना सुधारण्याची इच्छा आहे का ? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे . काही वाहिन्यांनी लोकशाहीच्या चौथ्या खांबाची अवस्था मंडप वाल्याच्या बांबू सारखी केली आहे . तुम्ही फक्त पैशांचे काय ,तेवढ बोला , बाकी मंडप तयार आहे .
धनंजय जुन्नरकर
सचिव , मुंबई काँग्रेस
सदस्य ,प्रसार माध्यम समिती ,मुंबई काँग्रेस
No comments:
Post a Comment