इंदिरा गांधी ,नरेंद्र मोदी अन आणीबाणीचे कवित्व
धनंजय जुन्नरकर
mob 9930075444
चौकट
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगली च्या वेळी जाहीरपणे " राज धर्माचे पालन करायला सांगितले होते , आता लालकृष्ण आडवाणी हे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना शब्द छल करत आडून आडून आणीबाणी येऊ शकते याविषयी सुचवत आहेत . ह्यावरून सध्या काय चालत आहे हे सांगण्याची गरज नाही . १९७५ ची आणीबाणी अन आत्ताची मोदी सत्ता या सर्व बाबींचा अभ्यास केला असता ,इंदिरा गांधी यांची चूक झाली की नरेंद्र मोदी बरोबर वागत आहेत ह्याचा निर्णय लोकांनीच घ्यायचा आहे .
इंदिरा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाची जडण घडण, आणीबाणी च्या आधीचा व आणीबाणी लावल्या नंतरचा भारत याचा सांगोपांग विचार करणे आजची गरज आहे .
लालकृष्ण अडवाणींनी आणीबाणी विषयी जी मते एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहेत हे पाहता कालचक्र पुन्हा त्याच मार्गाने मार्गोत्क्रमण करते हेही स्पष्ट झाले . भाजपचे सरकार असूनही त्यांना आणीबाणी लागणार नाही याची खात्री वाटत नाही यातच सर्व आले . नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे कोणत्याही मंत्र्याला स्वतःचा सचिवही नेमायचा अधिकार दिला नाही हे पाहिल्यावर त्यांना काम करण्याचा काही अधिकार दिला असेल असे वाटत नाही . नियोजन आयोगाची बरखास्ती ,शासकीय संस्थांचे भगवेकरण आणि फाजील वाद यात लोकांना काम दिसलेलेच नाही . महत्वाच्या आधारभूत संस्था जसे न्यायाधीकरण ,संसद ,माध्यमे आणि मंत्रिमंडळ हे देखील भयात वावरत आहे . वारंवार वटहुकुम काढणे ,परदेश गमन करणे , आणि देशाला जो आज मान मिळत आहे त्याला स्वतः कारणीभूत आहे अशा बाता परदेशात ठोकणे याच्या शिवाय काहीच घडताना दिसत नाही . इंदिरा गांधीच्या आणीबाणी पर्वात माध्यमांना सेन्सॉर केले जात होते ,नरेंद्र मोदीच्या काळात माध्यमे स्पॉन्सर झाली एवढाच काय तो फरक . इंदिरा गांधींच्या काळात विरोधी पक्ष कसा वागत होता हे पुढे लिहीले आहेच परंतु मोदींच्या काळात बहुतांश माध्यमे विरोधी पक्षांची सुपारी घेतल्या सारखी वागत आहेत हे कोणालाच नाकारता येणार नाही .
इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली असावी ? १९७५ साली भारतीय लोकशाहीच्या खांबां खाली काय उलथापालथ झाली ? ते एकाएकी का कोसळले असावे ? ते अचानक कोसळले तर ते त्या आधीच का नाही कोसळले ? या सर्व प्रश्नांचा विचार करायचा असेल तर , १९७१ चा बांगला देश मुक्ती संग्राम , १९७२ चा भीषण दुष्काळ ,अमेरिकेने अन्नधान्य भारताला देण्यासाठी केलेली अडवणूक ,१९७३ला तेलाच्या चारपट वाढलेल्या किमती ,३० टक्क्यांवर गेलेला चलन फुगवटा ,अन्नधान्य आणि जिवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई आणि या सर्वांचा गैर फायदा घेत जयप्रकाश नारायण यांनी सत्तेच्या राजकारणासाठी दिलेला संपूर्ण क्रांतीचा नारा आणि जॉर्ज फर्नांडीस यांनी देलेली रेल्वे संपाची हाक याचाही विचार करावा लागेल .
आपण ब्रिटीशांच्या विरोधात लढत आहोत की आपल्याच निवडून आलेल्या लोकां विरोधात आंदोलन करत आहोत हा सुध्दा फरक केला गेला नाही हे देखील भारतीय लोकशाहीचे दुर्देव आहे , हे येथे अधोरेखीत करावे लागेल .
" आपल्या सामाजिक व आर्थिक बाबींसाठी घटनात्मक पाठपुरावा न केल्यास अराजकता लोकशाहीचा घात करण्यास टपून बसलेली असेल " असा इशारा घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता . पण सत्ता परिवर्तनाच्या नावाखाली जयप्रकाश नारायण यांनी तो खुंटीवर टांगला . १९७५ च्या आधीची आपल्या देशाची अवस्था वर लिहिल्या प्रमाणे देशाला कडू डोस देण्या इतपत बिघडली होती .
आपण रेल्वे पासून सूरू करूया . भारतात आज आणि तेंव्हाही सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा सार्वजनिक उदयोग म्हणून रेल्वे कडे पहिले जाते . १९७३मध्ये रेल्वेत संप घडवून आणणे ,गो- स्लो ,काम बंद आंदोलन अशी आंदोलने जॉर्ज फर्नांडीस यांनी केली . त्या आंदोलना मागे रेल्वे कर्मचाऱ्यांचे भले व्हावे हा विचार नव्हता हे लगेच कळून आले . इंदिरा गांधी यांना सत्तेवरून खाली खेचणे हेच आपले उद्दिष्ट आहे हे त्यांनीच जाहीर केले होते . रेल्वेचा तोटा ,चलन फुगवटा ,वाढती महागाई ,जिवनावश्यक वस्तूंची टंचाई महिन्याला अडीच टक्क्यांनी होणारी महागाई वाढ आपल्या संपाने आठवड्याला अडीच टक्के होईल हे महिती असताना देखील ते रेल्वे कर्मचाऱ्यांना भडकावीत होते . रेल्वेच्या ७ दिवसाच्या संपाने देशाची सर्व औष्णिक केंद्रे बंद पडतील ,१० दिवसाच्या संपाने सर्व पोलाद कारखाने बंद पडतील आणि पुढील १२ महिने सर्व उदयोग धंदे थंडावातील ह्याची सर्वाना कल्पना होती . पोलाद कारखान्याची भट्टी एकदा बंद पडली तर ती पुन्हा पेटवायला ९ महिने जावे लागतात ह्याचे शास्त्र त्यांना चांगले माहित होते . रेल्वेच्या १५ दिवसाच्या संपाने देशाची उपासमार होईल अशी जाहीर आव्हाने ते सरकारला देत होते . टंचाई ग्रस्त भागात अन्नधान्य घेऊन जाणाऱ्या गड्यांना रुळावरून घसरविणे ,आग गाड्यांचे स्मशान भूमीत रुपांतर करणे असे कार्यक्रम त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर होते . अशा बिकट परिस्थितीतही इंदिरा गांधी धिरोदात्तपणे काम करीत होत्या .
गहू ,तांदूळ ,ज्वारी ,बाजरी अशा अन्न पदार्थांची प्रचंड भाववाढ झाली होती . त्यावेळी अहमदाबाद एल ड़ी . महाविद्यालयातील विद्यार्थांनी मेस च्या दरवाढी विरोधात आंदोलन केले . त्या आंदोलनाचे लोण पसरत गेले चिमणभाई पटेल हे गुजरात चे तत्कालीन मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याचा त्यांच्यावर आरोप करून १६८ आमदार संख्या असलेल्या विधान मंडळात काँग्रेसचे १४० आमदार असतानाही संपूर्ण सरकारला राजीनामा द्यायाला लावला . तेथे राष्ट्रपती राजवट लावण्यात आली . १९७७ साली मोरारजी देसाई यांचे सरकार येताच त्यांनी काँग्रेस ने हकालपट्टी केलेल्या याच चिमण भाई पटेल यांचा पाठींबा सरकार बनवायला घेतला . ह्यावरून संपूर्ण क्रांती चा भंपकपणा सिद्ध होतो . इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द व्हावी म्हणून उच्च न्यायालयात दावा ठोकणारे राजनारायण ह्यांनी सत्तेसाठी मोरारजी देसाई ह्यांना दूर करता यावे यासाठी आणीबाणीचे कथित खलनायक म्हणाविलेल्या संजय गांधी यांची मदत घेत होते . ही काही अशी एकमेव घटना नव्हती . वृत्त पत्रांवर सेन्सोर्शीप लादणाऱ्या विद्याचरण शुक्ल यांना चंद्रशेखर ह्यांनी परराष्ट्रमंत्री बनविले .
" सहमतीच्या राजकारणात माझी २ वर्षे वाया गेली त्या पेक्षा गुजरातच्या विद्यार्थांनी घडवलेला बदल जास्त योग्य होता "असे जयप्रकाश नारायण जाहीरपणे म्हणाले . २६ जानेवारीला त्यांनी प्रती प्रजासत्ताक दिन साजरा केला . फेब्रुवारीत आकाशवाणीवर मोर्चा , मार्च महिन्यात कर न भरण्याचे आंदोलन केले . कर न भरण्याच्या आंदोलनाबद्दल ६ जून १९७४ च्या पायोनियर च्या अंकात लिहीले होते , " सर्वोद्ययी नेते जयप्रकाश हे स्फोटकांशी खेळत आहेत . सरकार उलटवून टाकण्यासाठी ते जी चळवळ चालवत आहेत ,विधान सभेला घेराव घालत आहेत ,सरकार बद्दल पोलीसदलात अप्रीती निर्माण करत आहेत ,राज्याला " ना - कर " मोहिमेत बुडवू पहात आहेत त्यामुळे अनपेक्षित ,अभूतपूर्व हिंसाचार होऊ शकतो . त्यांच्या पद्धती ह्या बिगर लोकशाहीच्या आणि जुलूम जबरदस्तीच्या आहेत " . ११ जून च्या द हिंदू च्या अंकात लिहीले होते की ," निवडून आलेली विधानसभा केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बरखास्त करावी काय हा खरा प्रश्न आहे " . देशाची जबाबदारी न उचलणे ,राजकारणाच्या प्रवाहापासून दूर राहणे ,कायदा सुव्यावस्थे बाबत अनादर दाखविणे संपूर्ण देश गोंधळाच्या खाईत लोटण्यासाठी गांधीवादी नेते जयप्रकाश यांनी आपल्या स्थानाचा वापर करावा काय ? परंतु त्यांच्यावर या टिकेचा कोणताही परीणाम झाला नाही . जानेवारी १९७५ला रेल्वे मंत्री एल मिश्रा यांचा झालेला खून ,भारताच्या सर न्यायाधीशावर झालेला हल्ला देशाला वेगळ्याच मार्गाने घेऊन जात होता . १२ जून रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड भ्रष्टाचार आणि प्रचार सभेत राज्य शासनाच्या खर्चाने व्यासपीठ बनविले या मुद्यावर रद्द केली . सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचार हा मुद्दा टिकला नाही त्यांनी इंदिरा गांधी यांना केवळ लोकसभेत मतदानाला प्रतिबंध केला . विरोधी पक्षांनी देशव्यापी सत्याग्रह केला . पोलीस आणि सैन्याला सरकारचे आदेश न ऐकण्याची चिथावणी दिली . हे सर्व २५ जून च्या संध्याकाळ पर्यंत वाढत गेले व २६ जून रोजी पहाटे आकाशवाणीवरून आणीबाणी घोषीत करण्यात आली .
जयप्रकाश यांच्या अटकेनंतर सगळी आंदोलने बंद झाली . न्युयोर्क टाइम्स , गार्डियन ह्या दैनिकांनी जयप्रकाशजींच्या आंदोलनाला गर्दी करणारे लोक कुठे गेले असे प्रश्न उपस्थीत केले . वृत्तपत्रांनी रंगवलेले हे आंदोलन देशव्यापी नव्हते . या आंदोलनात प्रामुख्याने रास्व संघ ,आणि जनसंघाचे लोक होते हे स्पष्ट होते .प्रचार सभेत राज्य शासनाच्या खर्चाने व्यासपीठ बनविणे हे पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे होते किंबहुना असावे . त्यात सत्ता उखडून टाकावी असा कोणता भ्रष्टाचार झाला ?असा ही विचार लोकांनी केला होता हे तत्कालीन लोकसभेच्या निकालांवरून कळते . १९७१ ला आणीबाणी च्या आधी पाचव्या लोकसभेत एकूण ५१८ जागा होत्या पैकी काँग्रेसला ३५२ ( ४३ % मते ) जागा मिळाल्या होत्या . १९७७ आणीबाणी नंतर सहाव्या लोकसभेत
एकूण ५४२ जागा होत्या तेंव्हा जनतादल २६७ ( ४३. १७ % मते ) जागा तर काँग्रेसला १५४ ( ३४. % मते ) जागा मिळाल्या होत्या . इंदिरा गांधींवर प्रचंड टिका केल्या नंतरही काँग्रेसचे फक्त ११३ खासदार कमी झाले आणि १५४ खासदार निवडून आले .१९८० मध्ये जनता सरकार पडल्यावर लोकसभेच्या एकूण ५२९ जागांपैकी काँग्रेसला ३५३ जागा मिळाल्या तर जनतादल पक्षाला ३१ जागा मिळाल्या म्हणजे २ वर्षात २३६ खासदार कसे कमी झाले .? या निकालाचे अन्वयार्थ कसे लावायचे .?
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगली च्या वेळी जाहीरपणे " राज धर्माचे पालन करायला सांगितले होते , आता लालकृष्ण आडवाणी हे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना शब्द छल करत आडून आडून आणीबाणी येऊ शकते याविषयी सुचवत आहेत . ह्यावरून सध्या काय चालत आहे हे सांगण्याची गरज नाही . १९७५ ची आणीबाणी अन आत्ताची मोदी सत्ता या सर्व बाबींचा अभ्यास केला असता ,इंदिरा गांधी यांची चूक झाली की नरेंद्र मोदी बरोबर वागत आहेत ह्याचा निर्णय लोकांनीच घ्यायचा आहे .
धनंजय जुन्नरकर
No comments:
Post a Comment