Friday 19 April 2019

"मोदीजी" , आप "काम करो" तो जाने !


लोकसत्ता मध्ये 9 एप्रिल 2019 "पहिली बाजू " ह्या सदरा खाली "तुम मुझे मेरे काम से ही जानो " ह्या शिर्षकाखाली भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य श्री.विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे .त्या लेखाला प्रतिउत्तर देणारा काँग्रेस चा लेख .
*************************************

"मोदीजी" , आप "काम करो"  तो जाने !

**************************************

भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य श्री.विनय सहस्त्रबुद्धे ह्यांनी मोदींच्या कामगिरी चे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत नाही व इतके औदार्य ही सध्या नाही अशी तक्रार करणारा आणि "मोदी चालीसा" पध्दतीची स्तुती करणारा  लेख लिहिला आहे.

2014 च्या काळात जागतिक पटलावर सत्ता संघर्ष होता व लोकशाही टिकविण्यासाठी जग धडपडत होते अशी माहिती सहस्त्रबुद्धे लिहितात.
2014 साली मोदींनी सत्तेवर येऊन लोकशाही टिकविली असे आडून आडून सुचवितात .  1947 साली भारत आणि पाकिस्तान ह्यांचा जन्म एकाच वेळी झाला आज पाकिस्तानातली नसलेली लोकशाही बघा. मग नेहरूंनी आणि काँग्रेस ने काहीच केले नाही असे बोलायला मोकळे व्हा.

मोदी आणि लोकशाही हे परस्पर विरुद्ध अर्थी शब्द आहेत.
नोट बंदी चा रात्रीतून घेतलेला निर्णय, जीएसटी चा निर्णय , मध्यरात्री सीबीआय संचालक कार्यालयावर धाडी, त्यांची रात्री बदली ही सगळी
 "आदर्श लोकशाहीची" उदाहरणे समजावी काय ?
जनतेच्या विश्वासाला नख लावण्याचे काम मोदी सरकार ने वारंवार केले आहे. त्या मुळे मोदी आणि लोकशाही हे शब्द एकत्र उच्चारले तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते.

2012-2014 च्या काळात काँग्रेस सरकार बद्दल भ्रमनिरास झाल्याचे ते लिहितात. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल बाबा रामदेव ह्यांच्या सक्रिय
 "अ - राजकीय " चळवळी आणि कथित (न)झालेल्या घोटाळ्यांविषयी सहत्रबुद्धे प्रतिपादन करतात. दहशतवादी हल्ले , घटना झाल्याचे सांगून 
निरोगी लोकशाही साठी मोदी उदय झाल्याचे ते ठासून सांगतात. ह्या सर्व बाबींचे अवलोकन केले असता भाजपा आणि आरएसएस  विचारधारे च्या ह्या लोकांनी जनतेला कसे फसविले होते ते उमजले आहे. दिल्लीच्या जंतरमंतर वर मोदी सरकार येण्या आधीची अण्णा हजारे ह्यांच्या उपोषणाला होणारी गर्दी आणि साडेचार वर्षात लोकपाल न आल्यावर पुन्हा केलेल्या आंदोलना नंतर तेथे
 "न झालेली गर्दी " ह्यावरून हजारे ह्यांचे आंदोलन कोण चालवत होते ते जनतेला समजले. 
इंदिरा गांधी ह्यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी जयप्रकाश नारायण ह्यांच्या सभेला ही प्रचंड गर्दी आरएसएस च्या विचारांचे लोक करत होते. नंतर कार्यभाग उरकल्यावर त्यांच्या सभा ओस पडू लागल्या होत्या.हा इतिहास लोकांच्या लक्षात आहे. 
ह्या "अ-राजकीय" की अराजकीय  आंदोलनाचे लाभार्थी  अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. रामदेव बाबा ह्यांची 2012 पूर्वी ची जमीन, संपत्ती आणि 2019 मधील मालमत्ता ह्यांचा हिशोब केल्यावर ही आंदोलने का केली गेली हे लपून राहत नाही. ह्यांच्या आंदोलनांना काही पेड प्रसिद्धी माध्यमांनी किती वेळ दिला व सुपारी घेऊन बातम्या कशा केल्या ? ह्या बाबी पोषक लोकशाहीचे लक्षण आहे काय ? 

"ठाम विचार , निर्धारपूर्वक पाऊले टाकण्याची अजोड क्षमता " वगैरे मोठे मोठे शब्द लिहून  " मोदींना युगपुरुष"  दाखविण्याचा सहस्त्रबुद्धे केविलवाणा प्रयत्न करतात. 
मोदींची ठाम पाऊले गेल्या 5 वर्षात एक पत्रकार परिषद घेण्यासाठी ही कधी उचलली गेल्याचे 130 करोड जनतेने पाहिले नाही. त्यांची पाऊले त्यांच्या उद्योगपती मित्रांना घेऊन त्यांना परदेशी करार करण्यासाठी वारंवार एअरपोर्ट कडे जाताना पाहिली गेली. त्यांची पाऊले सतत निरनिराळ्या राज्यांच्या प्रचार रॅली साठी वारंवार मैदानांकडे वळलेली पाहिली गेली.
"भव्य दिव्य - थिंकिंग बिग " हे मोदींचे शब्द आणि योजना ह्यांचा शून्य उपयोग झाला आहे. काँग्रेस च्या योजनांना आकर्षक नावे देण्या बद्दल मात्र मी भाजपचे अभिनंदन करतो. काँग्रेस ने कामे करण्यावर लक्ष दिले , जाहिराती करण्याचे काम काँग्रेस ला करता आले नाही. कारण "बाते कम काम जादा" हा काँग्रेस चा नारा आहे.

ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून भाजपा 2014 ला सत्तेवर आले त्यात किती लोक जेल मध्ये गेले ?  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांना शेलकी विशेषणे लावून वारंवार अपमान केला गेला. मौनी बाबा, रिमोट कंट्रोल ने चालणारा , "बाथरूम मे रेनकोट पहनकर नहाने वाला" म्हंटलं गेलं. 
 मनमोहन सिंग म्हणाले होते , "अभी की मीडिया की तुलना मे इतिहास मुझसे दयालु रहेगा" . त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन भाजपने केले काय ? 

एका रात्रीत मनमानी करून नोट बंदी केली गेली तेंव्हा ते म्हणाले की 2 टक्के जीडीपी घसरेल व तसेच घडले. अर्थशास्त्री विद्वान लोकांचे अपमान करून भाजपने काय "बिग थिंक " केले कुणास ठाऊक !

मोदी हे कठोर शासकाची प्रतिमा असलेले नेते असल्याचे सहस्त्रबुद्धे लिहितात. परंतु वास्तव वेगळेच जाणवते.
मोदी हे स्वतःच्या च प्रतिमेच्या प्रेमात पडलेली व्यक्ती आहे. त्यांना लोकांनी प्रश्न विचारले ले आवडत नाही, प्रश्नांपासून पळणारा ,समस्यांपासून पळणारा, राष्ट्रभक्तीच्या आड लपून सैनिकांच्या नावाने मतदान मागणारा केविलवाणी अशी व्यक्ती ते वाटतात.

आज भाजपच्या जुमलेबाजी करणाऱ्या संकल्प वजा जाहिरनाम्याचे प्रकाशन झाले. आता मोदी गुजरात मॉडेल च्या गप्पा मारत नाहीत. 2 कोटी रोजगार निर्मिती बद्दल बोलत नाहीत,काळ्या धना बद्दल बोलत नाहीत. 2034 वगैरे पर्यंत इतके इतके लाख कोटी रुपये वगैरे चे मोठे मोठे शब्द फेकतात. जनतेने 5 वर्षा साठी सत्ता दिलेली असते. पुढच्या 50-60 वर्षांच्या गप्पा मारून भ्रामक आकडेवारी ने किती वेळ फसविणार ??
लेखाच्या अंती मोदींची कविता सहत्रबुद्धे लिहितात. 

" तुम मुझे मेरी तसबीर या पोष्टर में ढूंढ़ने की 

व्यर्थ कोशीश मत करो ।

मैं तो पद्मासन की मुद्रा में बैठा हूँ।

आपण अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे अजातशत्रू वगैरे आहोत असे त्यांना वाटत असावे.  स्वतःच्या कविते च्या ओळींशी स्वतः मोदी आणि त्यांचे कथित सहकारी  कशी प्रतारणा करत आहेत हे सगळा देश पाहत आहे.

 मोदी मोदी ही अक्षरे लिहिलेला सूट बनवून घालणे, "नमो टीव्ही" , बॅनर , पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज, सर्व वृत्तपत्रांमध्ये पान भर फोटो असलेल्या जाहिराती , पेन ,लॉकेट,  साड्या सर्वत्र फोटो लावून झालेले आहे.  भारतीय सेनेला "मोदी सेना" म्हणून झाले आहे.  आता फक्त आकाशातील ढगांवर आणि नदी समुद्रातील वाहत्या पाण्यावर मोदींचे फोटो बाकी आहेत. 
त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासना प्रमाणे त्यांची कविताही जुमला ठरावी ,ह्या बद्दल खेद आणि वैषम्य वाटते.
सॉरी सहस्त्रबुद्धे जी तुमची मेहनत वाया गेली .
 बेष्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टाईम !

धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता मुंबई प्रदेश काँग्रेस 

No comments:

Post a Comment