Friday 19 April 2019

*पंतप्रधान ते चौकीदार एक अपयशी प्रवास* !



*पंतप्रधान ते चौकीदार एक अपयशी प्रवास* !

16 एप्रिल ला लोकसत्ता मध्ये पहिली बाजू ह्या सदरात भाजपचे सरचिटणीस राम माधव ह्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची वारेमाप स्तुती करणारा " लोकांसाठीच पंतप्रधान !" हा लेख वाचला , त्या लेखावरील मुंबई काँग्रेस ची प्रतिक्रिया खालील प्रमाणे.


राम माधव ह्यांनी आपल्या लेखात मोदी ह्यांची तुलना ज्युलियस सीझर शी केली आहे. सीझर ने आपले नेतृत्व गुण दाखवून दिले त्याच प्रमाणे मोदीजी समाजमनावर आपली छाप दाखवून देत आहेत असे माधव म्हणतात.
ह्याच सीझर ला विरोधी मत प्रदर्शित करणारे आवडत नसत. त्यांना देशोधडीला लावण्याचे कार्य सीझर ने दडपशाही ने केले. मोदी सरकार चे काही लोक , व भाजपा संघटनेतील काही लोक इतरांना वारंवार पाकिस्तान मध्ये जाण्याची सूचना करत असतात.
सीझर ने स्वतःच्या सिनेटरांवर  प्रचंड दहशत ठेवली होती, तशीच दहशत आज आपल्याला दिसून येते.सीझर हा इतर सिनेटर्स पेक्षा खूप वरच्या पातळीला जाऊन हुकूमशहा बनू पाहात होता. त्याने त्यांच्या नाण्यावर एका बाजूला रोमन देवता तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे चित्र छापले होते.
आता जर पुन्हा ,"मोदी सरकार" आले तर ,
जशी एका रात्रीत नोटबंदी करून मनमानी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला खोल दरीत ढकलले होते तसे नोटांवर स्वतःचे फोटो छापायचे निर्णय देखील एका रात्रीत घेतील.
राम माधव म्हणतात प्रशियातील रणनीतीकार व महान योद्धा कार्ल व्होन क्लोजव्हीट्झ ह्यांनी " नेहमी बलवान "असणे हीच " उत्तम रणनीती असल्याचे सांगितले आहे.  बलवान असणे हे केंव्हाही चांगलेच परंतु बलवान असणे हे काही वैयक्तिक बलवान असणे नाहीए.
लोकशाही बलवान करावी लागेल, सहिष्णूता बलवान करावी लागेल स्त्रियांना , बेरोजगारांना, शेतकऱ्यांना बलवान करावे लागेल. पोलीस, न्याय ,पत्रकारिता देशाच्या स्वायत्त संस्था बलवान कराव्या लागतील. मोदी सरकार ने ह्याच्या सर्व विरुद्ध केले असून संस्था नष्ट करण्याचे कार्य अविरत चालू आहे. ह्यांच्या राज्यकरभारामुळे 8-10 उद्योग पती बलवान झाले.जे फार लवकर बलवान झाले ते त्वरित देश सोडून पळाले.  देशाला व्यक्ती केंद्रित बलवानता नको आहे. जनतकेंद्रीत प्रजासत्ताक हवे आहे.शासक बलवान झाला की तो हुकूमशहा होतो.
भाजपाला मोदींची हुकूमशाही हवी असू शकते परंतु देशाला ती परवडणार नाही.
"मोदींवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे " हा राम माधव ह्यांनी ह्या "शतकातील सर्वोत्तम विनोद" केलेला आहे.
वारंवार भाजपच्या वरीष्ठ पातळीवर च्या नेत्या प्रवक्त्यांना गांधीजींच्या मागे लपायला जावे लागते हा भाजपा वर काळाने उगविलेला सूड आहे.
आयुष्य भर कुजबुज चळवळीच्या माध्यमातून गांधीजींना शिव्या दिल्यावर आता त्यांच्या मार्गाने जायचे आहे हे वाक्य जेंव्हा गांधीजी स्वर्गात बसून ऐकत असतील तेंव्हा ते निश्चित हसतील . त्यांचे ते हास्य हे मोनालीसाच्या जगप्रसिद्ध चित्रातील हास्यापेक्षाही सुंदर आणि निखळ असेल.

मोदींच्या चौकीदार मोहिमेमुळे सामान्य माणसाच्या कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याची लोणकढीची थाप राम माधव मारून मोकळे होतात.
हा देश सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धी वर , प्रामाणिक पणावर ,राष्ट्र निष्ठेवर जिवंत आणि प्रगतिशील आहे.  70 वर्षातील देशाची प्रगती सामान्य माणसाच्या असामान्य गुणांमुळे , त्यागा मुळे झाली आहे. त्यात मोदीजींच्या चौकीदार मोहिमेचा दूरदूर मात्र काही संबंध नाही. निरव मोदी, विजय माल्या, ललित मोदी  आणि इतर असेच उद्योगपती नको ते उद्योग करून देशाबाहेर पळाले तेंव्हा "चौकीदार झोपला" होता. , हे सामान्य जनतेने "उघड्या डोळ्यांनी" पाहिले आहे.
मोडीजींनी गुजरात चे मुख्यमंत्री असताना काँग्रेस च्या ज्या योजनांना शिव्यांची लाखोली वाहिली, ज्या योजनांच्या नावाने बोटे मोडली त्याच योजना काहींची नावे बदलून आज त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आहेत. योजना ह्या अभ्यासकरून बनविल्या जातात. गटारातून गॅस काढून त्यावर पकोडे तळणे इतक्या स्वस्त पणे योजना बनत नसतात.

राम माधव म्हणतात जनधन, आधार , मोबाईल ने चित्र पालटले. ह्या तिन्ही पैकी कोणतीही वस्तू मोदींजींनी आणलेली नाही. राजीव गांधींनी संगणक आणला तेंव्हा त्यांच्या नावाने शंख फुकणारे आज डिजिटल इंडियाच्या गप्पा ठोकतात तेंव्हाही नियती हसत असते. 

मोदी सत्तेवर येण्याआधी ह्या देशात जणूकाही शौचालयेच नव्हती असे भासवायचा भाजपचा प्रयत्न असतो.
चंपारण्य सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात मोदीजी म्हणाले होते,  गेल्या आठवड्यात बिहारमध्ये साडेआठ लाख (8.5) शौचालये बांधली.
त्याचा जर हिशेब करायचा म्हंटले तर 1 मिनिटाला 84.31 शौचालये बांधली गेली पाहिजे. हे शक्य होते काय ? जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचे सांगतात त्यातीलच हा प्रकार आहे.
उत्तम संवाद कोशल्य मोदींकडे आहे ही बाब कोणीही नाकारू शकत नाही.
परंतु " उत्तम संभाषण " आणि " सत्य संभाषण " ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सत्य संभाषण हा गुण मोदींजीं कडे दुर्मिळ असावा.

"सबका साथ, सबका विकास" ह्या घोषणेचे जन्मदाते आपणच आहोत हे मोदीजी विसरलेले आहेत.
त्यामुळे ते आता पुलवामा, बालकोट आणि शहिद जवानांच्या नावावर मत मागत फिरत आहेत.  84 पेक्षा जास्त देशांचा दौरा - त्यावर खर्च करणे ,स्वतःच्या जाहिरातींवर जनतेच्या कष्टाच्या पैशाची धूळधाण करून खर्च करणे
ह्या मुळे जनतेला शून्य फायदा झालेला आहे. निरनिराळे साहित्यिक बोजड शब्द वापरून मोदींची प्रतिमा उंचावण्याचे राम माधव ह्यांचे प्रयत्न थीटे पडताना दिसतात. आडात असेल तर पोहऱ्यात येईल ही म्हण काहीतरी अभ्यासा अंतीच बनली असावी .

हुकूमशाह ज्युलियस सीझर चा अंत खूप करूण अवस्थेत झाला.
ज्युलियस सीझर ही एक शोकांतिका आहे. 
भारताच्या पंतप्रधान व्यक्ती साठी आपल्याला ज्युलियस सीझर ची काहीच गरज नाही.  आपण सर्वांना मान देतो व विविधतेचा पुरस्कार करतो. आपला इतिहास जास्त समृद्ध आहे. कृपया मोदींचे कौतुक करताना त्याचा अभ्यास करा.  


धनंजय जुन्नरकर

सचिव, प्रवक्ता मुंबई प्रदेश काँग्रेस.
💐🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment