Thursday, 4 June 2020

महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व





महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व

धनंजय जुन्नरकर

सचिव , मुंबई काँग्रेस ,

पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव  चव्हाण विद्यापीठ ,नाशिक

                                                                                                                                                                  djunnarkar74@gmail.com




चौकट

शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरीपाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही ,हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे . देव आणि महिला यांच्यात तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?

***************************************************************************************************************************************************



                                        हाजी अली आणि शनि शिंगणापूर ही  धार्मिक स्थाने सध्या वादाची आणि मुलभूत अधिकारांच्या कक्षा रुंदावण्याच्या चर्चेची केंद्र बनलेली आहेत . ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या धर्माची आहेत परंतु,महिलांना प्रतिबंध करण्याच्या बाबतीत समान आहेत .हाजी अली दर्ग्यात गेली कित्येक वर्ष दर्ग्यातील कबरीला हात लावून महिला प्रार्थना करू शकत होत्या . परंतु,२०१२ पासून दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली आहे . शनि देवस्थानच्या विश्वस्त मंडळानेही महिलांना चौथऱ्यावर जायला बंदी केली आहे . दोन्ही धर्माच्या महिला याविरुध्द आंदोलन आणि कोर्ट कचेऱ्या करत आहेत . केरळच्या शबरिमल देवस्थानाचे प्रकरण असेच असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे . त्यामुळे कनिष्ठ न्यायालयांनी देखील आपला निर्णय दिलेला नाही .

                                   धर्म आणि त्या संबंधी वाद हे, एक प्रकारचे" आग्या मोहोळ " असते, अशी जगातल्या सर्व राजकीय पक्षांची धारणा असते . जे राजकीय पक्ष फक्त धर्म केंद्रित राजकारण करतात ते ह्याला अपवाद आहेत . ते याच्यातून आपला फायदा तपासत असतात . राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी यावर स्वातंत्र्यापूर्वी वाद झडत होते . धर्माचे अवडंबर न माजविणे आणि सामाजिक सुधारणांना गती देणे, हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे . लोकांच्या सारासार बुद्धीला तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टीचे कोंदण चढविणे गरजेचे आहे .

              " यत्र नार्यस्तु पुजयन्ते ,रमन्ते तत्र देवता - अर्थात नारीला जेथे  पूजनीय मानली जाते -तिचा सन्मान केला जातो, तेथे देव निवास करतात . मग जेथे देव निवास करतात तेथेच आपण नारीला जाऊ देणार नसू ,तर मग ही उक्ती खोटी आहे असे म्हणावे लागेल किंवा मग तसे वागावे तरी लागेल .

  शनि शिंगणापूरच्या दर्शनाच्या महिला प्रवेश बंदीची परंपरा ४०० वर्षांची ,केरळच्या शबरिमल देवस्थानाची परंपरा ५०० वर्षांची ,हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी नाकारण्याची परंपरा २०१२ पासून आहे . अशा परंपरांचा अभिमान बाळगायचा की त्यात सुधारणा करायची हा महत्वाचा प्रश्न आहे .

  वर्ण व्यवस्था ,वर्ग व्यवस्था यावर स्वातंत्र्यपूर्वी आणि त्या नंतरही चर्चा आंदोलने चालू आहेत . जाती भेद मानून स्वतःच्या अपत्यांना "ओनर किलिंग "च्या नावाने मारून टाकायचे ,  असे आदेश देणाऱ्या अनधिकृत जात पंचायती ,खाप पंचायती चालवायच्या, हे आपण अजूनही पाहत आहोत .

  ताजमहल मधील मुमताजची कबर ,फतेहपुर सलीम चिश्ती  दर्गा ,नागपूर येथील ताजुद्दीन बाबा दर्गा व अजमेर शरीफ दर्ग्यात महिला" मझार "पर्यंत जाऊ शकतात . पण २०१२ च्या हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाच्या फतव्या पासून महिला हाजी अली यांच्या दर्ग्यात मझारी पर्यंत जाऊ शकत नाहीत . हे भेद आपण का पाळायचे ?असे महिलांना वाटले असल्यास नवल नाही . जगातले सर्व धर्म गुरु महिलांच्या हक्कांच्या विरुध्द एक असतात हे वारंवार दिसलेले आहे . पद्मश्री ,पद्म भूषण किंवा तत्सम सन्मान मिळविणारे साहित्यीक अशा धार्मिक वादांवर सहसा लिहित नाहीत . कशाला उगाच वाकड्यात शिरा ?असा त्यांचा आविर्भाव असतो . काही विद्वान लोक स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे असे दर्शविणारे तर काही पंडित ,अगदी त्याच्या विरुध्द विचाराचे श्लोक पुरावा म्हणून दाखवतात . टि आर पी च्या नादी लागलेली दृश्य प्रसार माध्यमे १०० वेळा ब्रेक घेऊन प्रश्नाच्या चर्चेचा पार चोथा करून टाकतात .उथळ चर्चा करण्यापेक्षा खोलात जाऊन चर्चा करायची कोणाचीच इच्छा नाही .

                                         हिंदू धर्मातील जुनाट पुराणवादी रूढी , परंपरा बदलण्यासाठी राजाराम मोहन रॉय ,महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य वेचले . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्माचा त्याग केला . बरीच आंदोलने ,लढा , दिल्या नंतर अनेक सुधारणा झाल्या . १९२९ चा बाल विवाह विरोधी कायदा ,१९६१हुंडा प्रतिबंध कायदा ,१९६९ घटस्फोट कायदा ,१९८७ सती प्रथे विरुध्द कायदा ,१९९४ लिंग निदान प्रतिबंध कायदा आपण केला . देवदासी प्रथा ,विशेष विवाह ,असे कायदे वेद ,शास्त्र ,पुराणात लिहिले होते काय ?मंदिर ,मस्जीत मध्ये लाउड स्पीकर लावा ,असे भगवद गीतेत किंवा पवित्र कुरआन याच्यात लिहिले आहे काय ?समुद्र ओलांडायचा नाही असे, जवळ -जवळ पूर्वीच्या सगळ्यांनी सांगितले आहे . तर मग आता कोणत्या धर्मातील लोक समुद्र पार करत नाहीत ?

                         पुरुषसत्ताक विचार आणि धर्म मार्तंडांनी महिलांना मतदानाचा अधिकारही नाकारला होता . निरनिराळ्या देशातील महिलांनी या साठी प्रचंड लढा दिला ,तेंव्हा हा अधिकार मिळाला . १८९३ ला न्यूझीलंड ने ,१९१८ मध्ये इंग्लंड ने १९२० मध्ये अमेरिकेने तर सौदी अरब च्या शाह अब्दुल्ला ह्यांनी २०११ला महिलांना मतदानाचा तर २०१५ ला निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला .

हिंदू संस्कृतीचे अवलोकन केले असता ब्रम्हा ,विष्णु , महेश हे सृष्टीचे रचेते आहेत .अत्री ऋषी यांच्या पत्नी अनुसूया माता ह्यांनी आपल्या तपोबलाने ह्या तिन्ही देवांचे  बाळांमध्ये  रुपांतर केले होते . सृष्टीच्या रचेत्यांचे महिला ,जर बाळ बनवू शकत असतील तर इतर देवांचे दर्शन घ्यायला स्त्रियांना कोण कशी काय बंदी घालू शकेल ?

                                         भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्म निरपेक्ष व लोकशाही गणराज्य हे शब्द आहेत . सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयातून राज्य घटनेच्या सरनाम्याचे महत्व सांगितले आहे . ह्यात सामाजीक ,आर्थिक आणि राजनैतिक विचार अभिव्यक्ती ,विश्वास ,श्रद्धा व उपासना ह्याचे स्वातंत्र्य आहे . भारत सरकार व राज्य सरकारला जे अधिकार प्राप्त आहेत ते लोकांपासून मिळालेले अधिकार आहेत . त्यात महिलांचाही समान सहभाग आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम १४ हे समानता तर कलम १५ नुसार धर्म,वंश ,जात ,लिंग ,जन्म स्थान ह्यावरून कोणतेही भेदभाव होणार नाही ,हे दर्शविलेले आहे .मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम २ मध्ये ह्याच बाबी सांगितलेल्या आहे . भारतीय राज्य घटनेचे कलम २५ नुसार समानतेने सारासार विचार करायचे आणि पेशा आचारण्याचे -धर्म प्रसाराचे स्वातंत्र्य आहे . मानवी हक्कांचा जाहीरनामा कलम १४ आणि १८ नुसार देखील हेच सांगितले आहे . धर्माद्वारे भेद भाव करण्याचे  अधिकार कोणालाच नाहीत . " जेंव्हा एखाद्या ऐतिहासिक कारणांनी "संधी बाबत प्रचंड असमानता" निर्माण होते ,तेंव्हा अंतिम ध्येया पर्यंत समानता पोहोचविण्यासाठी " न्याय्य भेद " म्हणजेच पॉजीटिव्ह डिसक्रीमिनिशेन किंवा विश्वास दर्शक कृती केली जाऊ शकते . आंतर राष्ट्रीय कायद्याच्या हक्कांमध्ये " विशेष ऊपाय " केले जाऊ शकतात . "

                                         राजकीय पक्ष , धार्मिक गुरु ह्यांच्यापेक्षाही मानव म्हणून मिळालेले अधिकार सर्व श्रेष्ठ आहेत . त्यामुळे मानव म्हणून महिलांच्या अधिकारांचे महत्व जास्त आहे . हिंदू संस्कृतीत अहिल्या ,द्रौपदी ,सीता ,तारा ,मंदोदरी  ह्या पाच पतिव्रता होत्या . त्यांच्या स्मरणाने देखील पाप मुक्त होतो ,असे श्लोक दर्शवितात . शेवटी त्यांनाही पुरुष सत्ताक पद्धतीतच राहावे लागले असा इतिहास आहे . जेथे ह्या महान स्त्रियांना अग्नी परीक्षा चुकली नाही तेथे सामान्य महिलांना कसे काय अधिकार मिळणार ?

असे म्हणतात की , ५० वर्षानंतर भोजनात बदल करायला हवा ,

                         १००  वर्षानंतर घर पाडायला हवे ,

                        ५००  वर्षानंतर देऊळ पाडायला हवे ,

                        १०००  वर्षानंतर धर्माला काडी लावायला हवी !

अर्थात , ५०  वर्षानंतर माणसाची पचन व्यवस्था कमकुवत होते ,१००  वर्षानंतर घर व ५०० वर्षानंतर देऊळ जीर्ण होते ,त्यांचा जीर्ण उध्दार करावा लागतो . १०००  वर्षानंतर धर्मात नकारात्मक बाबींचा अंतर्भाव होतो , त्यातल्या निरुपयोगी रूढी -परंपरा रुपी कचरा जाळून टाकायला हवा असे म्हटले गेले आहे . असे केल्यास सर्व बाबींचा आपण नव्याने आनंद घेऊ शकू व एक सुसंस्कृत समाज आपल्याला  स्थापन करता येईल  .


                                शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे जिवंत माणूस हा जास्त महत्वाचा आहे . आपण गाईचे अधिकार मानतो पण बाईचे अधिकार मानत नाही . नुसते "सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी "म्हटल्याने आपली सुटका नाही . माणूस म्हणजे संत साहित्यात सांगितल्या प्रमाणे हाड,मांस ,आणि रक्ताचा आकार बध्द चिखल आहे . शरीराच्या आत मलमुत्र घेऊन प्रत्येक व्यक्ती फिरत आहे . त्यात महिला आणि पुरुष यांत काहीही फरक नाही . कुणाला कबरी पाशी जाऊ दयायचे नाही, कुणाला चौथऱ्यावर जाऊ दिले जात नाही हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवरचे आक्रमण मानले पाहिजे . जर देवाच्या आज्ञेच्या विरुध्द महिला दर्शन घेऊ इच्छित असतील ,तर त्यांना शिक्षा करायचा  देवाचा अधिकार आहे  . देव आणि महिला यांच्यात ,तुम्ही-आम्ही आणि त्या ट्रस्ट ने तरी का पडायचे ?


धनंजय जुन्नरकर

सचिव , मुंबई काँग्रेस ,

पदवी ,मानवी हक्क ,यशवंतराव चव्हाण विद्यापीठ ,नाशिक


---------- Forwarded message ----------
From: "DHANANJAY JUNNARKAR" <djunnarkar74@gmail.com>
Date: 10 Feb 2016 11:05 p.m.
Subject: महिलांचे देवदर्शन आणि बेगडी पुरोगामित्व ,धनंजय जुन्नरकर 9930075444
To: "Dhananjay Junnarkar" <djunnarkar74@gmail.com>
Cc:


Show quoted text


राज्यपाल हवेतच कशाला?

लेख

राज्यपाल हवेतच कशाला?
–---------------------------------------

राज्यपाल पदाची या देशाला काही गरज आहे का ?आणि राज्यपालांवर होणारा खर्च हा काही आवश्यक आहे ?का येथून लोकांमध्ये चर्चा आणि नाराजगी आहे .

अंतिम वर्षाची पदवी परीक्षा  कोरोना मुळे घेता येणे शक्य नसल्याने व 10 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न असल्याने महाराष्ट्र शासनाने सदर परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले 
ह्यावर भाजपचे नेते राज्यपालांना हाताशी धरून राजकारण करू लागलेले आहे .

 महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करू लागले आहेत. 
महाराष्ट्रातील जनता हे सर्व खेळ बघत आहे . अनुदान आयोग ,तज्ञ समिती ह्यांनी , कुलपतींनी परीक्षा घ्यावी असे सुचवले असे म्हणतात.

 उद्या दहा लाख विद्यार्थ्यांपैकी 5 हजार विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर हे राज्यपाल आणि इतर तज्ञ बोरू बहद्दर याची जबाबदारी घेणार आहेत का?

हे स्व कथित तज्ञ दरवर्षी निकाल ,प्रवेश पात्रता, परीक्षा यांचा गोंधळ करून ठेवतात.

 आजपर्यंत त्यांना साधी वेळेवर परीक्षा घेऊन त्याच काळामध्ये निकाल लावणे जमलेले नाहीए. 
सर्व साधारण परिस्थितीमध्ये देखील जी कामे वेळेवर व्हावी ती कामे हे तज्ञ आजतागायत  करू शकलेले नाहीत.

या जागतिक आपत्तीमध्ये कोरोनाच्या संकटामध्ये हे लोक या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात, असे म्हणणे म्हणजे 
"मूर्खपणाचा कळस" आहे.

भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांसाठी जे 'मूलभूत अधिकार' दिलेले आहेत त्यात ही प्रसंगी त्या अधिकारांवर देखील वाजवी निर्बंध टाकून त्यांनाही अपवाद निर्माण करण्यात आलेले आहेत.

 तर विद्यापीठ कायद्यावर बोट दाखवून आठ दहा लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा मूर्खपणा ,
एखादा राज्यपाल सांगतोय आणि त्याची एक संपादक त्याची बाजू घेतोय म्हणून सरकारने बदलावा अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे काय?

कोरोनाची ही जागतिक आपत्ती महाराष्ट्र शासनाने आणलेली नाही,
 याची जाणीव राज्यपालांना असेल असे मानायचा प्रयत्न करू.

राज्यपालांना या पदवी परीक्षेचा इतका पुळका आला आहे  तर त्यांनी पंतप्रधान मोदींचा "नमस्ते ट्रम" हा कार्यक्रम करायला विरोध का केला नाही.
 जानेवारी महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय  विमाने मुंबईमध्ये महाराष्ट्र मध्ये यायला बंद करण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार का केला नाही ?

 हा रोग जर महाराष्ट्रात आलाच  तर विद्यार्थ्यांना , महाराष्ट्रातील जनतेला त्रास होईल या संदर्भामध्ये जानेवारी महिन्यापासून राज्यपालांनी केंद्राशी किंवा राज्याशी एकही पत्रव्यवहार केलेला आहे काय?

भाजपचे मंत्री ,भाजपचे नेते, त्यांचे शैक्षणिक पात्रता आणि त्यांच्या डिग्र्या या सर्व विषयांवर मुंबई विद्यापीठात "पीएचडी" चा एक अभ्यासक्रम होऊ शकतो,
 इतका मूर्खपणा आज महाराष्ट्रातील नव्हे संपुर्ण देशातील जनता बघत आहे.

महाराष्ट्राचे सरकार हे लोकांमधून निवडून आलेले सरकार आहे .
 त्यांच्यावर महाराष्ट्रातील 11-12 करोड जनतेची जबाबदारी आहे .

 कोशयारी ह्यांचे
 राज्यपाल पद हे मोदी सरकारने त्यांच्या पक्षातील व्यक्ती साठी केलेली सोय आहे .
उद्या मोदींच्या मनात आले तर ते राज्यपालांना कुठेही नेऊन बदलतील .

महाराष्ट्राचे सरकार हे जनतेचे सरकार आहे . विद्यार्थी हे राष्ट्रीय संपत्ती आहेत.
आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेल्या आहेत वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार यावर्षी 102 टक्के पाऊस पडणार आहे  .कोरोना रुग्णांवर जगाला अजून चांगला उपचार आणि लस सापडलेली नाही.
 हजारो लाखो लोक बेकार झालेले आहेत.

प्रचंड बेकारी -आर्थिक मंदी चे वातावरण आहे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत.
 नवीन नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
 लोकांच्या खिशात पैसा नाही.
 येणाऱ्या कालावधी मध्ये कुठे दुष्काळ कुठे पाऊस कुठे नदीनाल्यांना पूर या आपत्या चालूच आहेत. 

अशा सर्व आपत्तींमध्ये जर काही महत्त्वाचं असेल तर तो माणसाचा जीव असतो .
 हे देखील राज्यपाल विसरून गेलेले आहेत.

कुठलेही विद्यापीठ आणि कुठल्याही अंतिम परीक्षेपेक्षा
 "जगण्याची परीक्षा" ही सर्वात मोठी परीक्षा आहे .
जर माणूस जगला तर शिक्षण व  शिक्षण घेतले तर त्याची परीक्षा हे तत्त्व आहे .

ज्येष्ठ आणि नामवंत कवी नारायण सुर्वे यांची 
"माझे विद्यापीठ" ही देखील खूप गाजलेली कविता आहे .

या कवितेचा अर्थ देखील आयुष्याशी निगडीत आहे.
 माणसाचा आयुष्य राहिलं तो नीट जगला तर त्याला अर्थ आहे.
 आयुष्याचे हे शिकवणें ह्यालाच त्यांनी आयुष्याच्या विद्यापीठ ही उपमा दिलेली आहे .
"राज्यपालांचे विद्यापीठ" म्हणजे आरएसएस शाखा आणि भाजपचे कार्यालय असणार यात संशय नाही.

 म्हणून त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील आठ लाख दहा लाख विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणे हे योग्य ठरणार नाही.
 राज्यपालांना प्रामाणिकपणे काम करणे आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणे जर जमत नसेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन मानाने इथून निघून जावे .
अशा राज्यपालांची महाराष्ट्राला गरज नाही .

धनंजय जुन्नरकर 

सचिव मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी

Friday, 27 December 2019

...आणि जिन्ना हसला


...आणि जिन्ना हसला !


24 डिसेंम्बर मंगळवार च्या अंकात "राजकीय मतलाबासाठी दिशाभूल "  ह्या शिर्षकाखाली भाजपचे प्रदेश ,सहमुख्य प्रवक्ते  केशव उपाध्ये ह्यांचा लेख "पहिली बाजू " या सदरात प्रसिद्ध झाला आहे.
सदर लेखात ते म्हणतात " विरोधकांकडून आक्षेपाचे मुद्दे न मांडताच केवळ विरोध दिसून येतो. संवादाची भाषा करताना केवळ आकांडतांडव करायचे ही एकमेव गोष्ट विरोधकांकडून दिसून येत आहे.
त्यांचे हे मत, जेंव्हा पासून महाराष्ट्र विकास आघाडी ची सत्ता आली आहे तेंव्हा पासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे वर्तन करत आहे त्याबाबतीत तंतोतंत लागू होते.
नागरिकत्व दुरुस्ती च्या नावाने मोदी सरकार जे काही करत आहे त्यावरून समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासण्याचेच कार्य चालू असल्याचे दिसून येते.
मागील 14 वर्षांपैकी 11 वर्षे भारतात राहणाऱ्या नागरिकांचा च ह्यापूर्वी विचार केला जात होता.त्यात सुधारणा करून आता 6 वर्षे देशात वास्तव्य करणार्यांना देखील नागरीक बनविण्यात येणार आहे. त्यामुळे देशात ह्या पुढे नागरिकत्वाचे 2 प्रकार बनतील. हे भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन आहे. ह्या कायद्यातून मुस्लिमांना वगळले आहे हे असमानतेचे द्योतक आहे.
मुस्लिम बहुल राष्ट्रात अहमदीया, शिया समाजावर होणारा अत्याचार ह्या कडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आलेली आहे. श्रीलंकेत तामिळ बांधवांवर श्रीलंका सरकार रोज प्रेमाचा वर्षाव करत आहे काय?
वि. द. सावरकर आणि बॅ. जिन्ना ह्यांचा द्विराष्ट्र सिद्धांत आणि आरएसएस चे बुद्धी नसलेले सिद्धांत ह्यांची एका पात्रात कालवा कालव करून जे काही बनले त्यातुन सदर कायद्याच्या तरतुदी निर्माण झाल्या असाव्यात असा जनतेमध्ये संभ्रम आहे.
नेशनल रजिस्टर ऑफ सिटीझन ( NRC) हा कायदा आणि नागरिकत्व दुरुस्ती  कायदा  ह्यांचे एकत्रीत परिणाम अभ्यासावे लागणार आहेत.
देशाची एकता- अखंडता -शांतता -व्यापार समृद्धी ह्यांची विल्हेवाट लावणारी ही विधेयके आहेत. पाशवी बहुमत जे करेल ते चांगलेच असते असा काही नियम नाही.
देशातून शक्य असेल तेथून मुस्लिमांना त्रास देणे ह्या एक कलमी कार्यक्रमावर सरकार काम करत आहे. आसाम मधून मुस्लिम धर्मियांना बाहेर काढू ह्याच्या साठी NRC राबवण्यात आली. 19 लाख भारतीयांना निर्वासित घोषित केले त्यात 12 लाख हिंदू निघाल्याने मग सरकार ची भंबेरी उडाली. ह्यात मंत्री, न्यायाधीश, मोठमोठे अधिकारी आपले पुरावे दाखवू शकले नाहीत तर सामान्य जनते चे काय हाल असतील? 
कोणताही नवीन कायदा हा सामाजिक, आर्थिक, व राजकीय अशा तिन्ही कसोट्यांवर घासून तपासून घ्यायला पाहिजे. जेंव्हा आर्थिक संकट गंभीर असेल तेंव्हा आर्थिक बाब अधिक महत्वाची आहे. आता आसाम च्या बाबतीत बघा ,आसाम ची लोकसंख्या 3 कोटी ,क्षेत्रफळ 78,438 किमी येथे NRC प्रक्रिया राबविण्याचा खर्च आला 1220 कोटी रुपये. ही प्रक्रिया संपूर्ण भारतात राबविण्यासाठी येणारा अपेक्षित खर्च जवळपास 60,000 कोटी रुपये आहे.
आपले सरकार नवरत्न कंपन्या विकायला निघाले आहे. कामगारांना 3-3 महिने पगार नाही, बँका बुडत आहे,शेतकरी आत्महत्या करत आहेत, व्यापारी झोपले तरी सरकार ला हे मुद्दे महत्वाचे वाटत नाहीत.
Gst चे पैसे  अपेक्षितसंकलन न झाल्याने सरकार इतर राज्यांना त्यांनी कबूल केलेली रक्कम देऊ शकत नाही.
महाराष्ट्र सरकारचे Gst चे 15000 कोटी रुपये मोदी सरकार ने थकविले आहेत. वेळच्यावेळी पैसे मिळाले तर त्याचा उपयोग असतो .
सरकारच्या मनमानी करणाऱ्या कायद्याला 
8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे.
अशा प्रकारे देशात दुहीचे वातावरण पेटत चालले आहे.
नोटबंदी नंतर संपूर्ण देश स्वतःच्या पैशासाठी ( 2000 रुपये) रांगेत उभा असलेला आपण पाहिला. एकही उद्योगपती ह्या रांगेत आपण पाहिला काय? 103 लोक ह्या रांगेत उभे राहून मेले, सरकारने त्यांच्या साठी 2 ओळींच्या संवेदना व्यक्त केल्याची आठवण नाही.
आता ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नव्हता त्या आरएसएस च्या अजेंड्या वरून सगळ्या भारताला आपले नागरिकत्व दाखविण्यासाठी कागदपत्रे घेऊन भिकार्यासारखे रांगेत उभे राहावे लागणार आहे. ह्या रांगेत गरीब, लाचार, अनाथ, महिला, जेष्ठ नागरिक , भटक्या जातीतील , लोक उभे दिसतील. त्यांच्याकडे कुठे कागदपत्रे सापडणार आहेत? त्यांना निर्वासित घोषित करणार.
मोदी जी आणि स्मृतीजी नी त्यांच्या पदव्या अजून भारतीय जनतेला दाखविलेल्या नाहीत आणि आमच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे मागितले जात आहेत असा जनआक्रोश नाक्यानाक्यावर ऐकू येत आहे.

ज्यांच्याकडे पुरावे नाहीत असे 19 लाख लोक एकट्या आसाम मध्ये आहेत, पूर्ण भारतात 4-5 कोटी अंदाजे निघाले तर त्यांचे काय करणार?
 निर्वासितांसाठी डिटेन्शन कॅम्प बांधायचे आदेश- मार्गदर्शक तत्वे केंद्राने राज्याला दिल्याचे समजते.

हा खर्च कुणाच्या खिशातून करणार?
त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च कोण करणार.
चालू- सुरळीत जीवनाची घडी विस्कटून रेघोट्या मारण्याचे उद्योग मोदी सरकार कधी बंद करणार?

पंतप्रधान मोदी म्हणतात Nrc ची चर्चा अजून झालेली नाही. अमित शाह आणि राष्ट्रपती ह्यावर भाष्य करून मोकळे झालेले आहेत.
मोदी सरकार जबाबदारीने आणि सत्य कधी बोलणार?

स्वतंत्र, सार्वभौम, अखंड, धर्मनिरपेक्ष, समृद्ध भारताचा विनाश आपण आपल्या हाताने करत आहोत ह्याची थोडीही जाणीव भाजपा ला नाहीए ह्याचे प्रचंड दुःख आहे.

18 मे 1974 ला भारताने पहिली अणुचाचणी केली तेंव्हा त्याचे सांकेतिक नाव ' आणि बुध्द हसला " हे होते.
हे भारताच्या सार्वभौम प्रतिमेचे संवर्धन करणारे होते.
आज "मोदी आणि शाह" ह्या व्यक्ती म्हणजेच "सरकार" झालेल्या असून ज्या प्रकारे संपूर्ण देशात , विद्यापीठात , मोर्चे निघत आहेत, लाखो लोग बिना झेंड्याने एकत्र येत आहेत, आपला असंतोष दाखवत आहेत ते पाहता
 पाकिस्तान च्या  कबरी मधून , 
" आणि जिन्ना हसला ......"
हेच वाक्य  ऐकू येत आहे.

 जे जिन्ना करू शकले नाहीत त्याचा पुढच्या अध्याय मोदी सरकार लिहित आहे काय?
तेंव्हा सावध रहा !


धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता 
मुंबई प्रदेश काँग्रेस

Friday, 19 April 2019

*पंतप्रधान ते चौकीदार एक अपयशी प्रवास* !



*पंतप्रधान ते चौकीदार एक अपयशी प्रवास* !

16 एप्रिल ला लोकसत्ता मध्ये पहिली बाजू ह्या सदरात भाजपचे सरचिटणीस राम माधव ह्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची वारेमाप स्तुती करणारा " लोकांसाठीच पंतप्रधान !" हा लेख वाचला , त्या लेखावरील मुंबई काँग्रेस ची प्रतिक्रिया खालील प्रमाणे.


राम माधव ह्यांनी आपल्या लेखात मोदी ह्यांची तुलना ज्युलियस सीझर शी केली आहे. सीझर ने आपले नेतृत्व गुण दाखवून दिले त्याच प्रमाणे मोदीजी समाजमनावर आपली छाप दाखवून देत आहेत असे माधव म्हणतात.
ह्याच सीझर ला विरोधी मत प्रदर्शित करणारे आवडत नसत. त्यांना देशोधडीला लावण्याचे कार्य सीझर ने दडपशाही ने केले. मोदी सरकार चे काही लोक , व भाजपा संघटनेतील काही लोक इतरांना वारंवार पाकिस्तान मध्ये जाण्याची सूचना करत असतात.
सीझर ने स्वतःच्या सिनेटरांवर  प्रचंड दहशत ठेवली होती, तशीच दहशत आज आपल्याला दिसून येते.सीझर हा इतर सिनेटर्स पेक्षा खूप वरच्या पातळीला जाऊन हुकूमशहा बनू पाहात होता. त्याने त्यांच्या नाण्यावर एका बाजूला रोमन देवता तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे चित्र छापले होते.
आता जर पुन्हा ,"मोदी सरकार" आले तर ,
जशी एका रात्रीत नोटबंदी करून मनमानी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला खोल दरीत ढकलले होते तसे नोटांवर स्वतःचे फोटो छापायचे निर्णय देखील एका रात्रीत घेतील.
राम माधव म्हणतात प्रशियातील रणनीतीकार व महान योद्धा कार्ल व्होन क्लोजव्हीट्झ ह्यांनी " नेहमी बलवान "असणे हीच " उत्तम रणनीती असल्याचे सांगितले आहे.  बलवान असणे हे केंव्हाही चांगलेच परंतु बलवान असणे हे काही वैयक्तिक बलवान असणे नाहीए.
लोकशाही बलवान करावी लागेल, सहिष्णूता बलवान करावी लागेल स्त्रियांना , बेरोजगारांना, शेतकऱ्यांना बलवान करावे लागेल. पोलीस, न्याय ,पत्रकारिता देशाच्या स्वायत्त संस्था बलवान कराव्या लागतील. मोदी सरकार ने ह्याच्या सर्व विरुद्ध केले असून संस्था नष्ट करण्याचे कार्य अविरत चालू आहे. ह्यांच्या राज्यकरभारामुळे 8-10 उद्योग पती बलवान झाले.जे फार लवकर बलवान झाले ते त्वरित देश सोडून पळाले.  देशाला व्यक्ती केंद्रित बलवानता नको आहे. जनतकेंद्रीत प्रजासत्ताक हवे आहे.शासक बलवान झाला की तो हुकूमशहा होतो.
भाजपाला मोदींची हुकूमशाही हवी असू शकते परंतु देशाला ती परवडणार नाही.
"मोदींवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे " हा राम माधव ह्यांनी ह्या "शतकातील सर्वोत्तम विनोद" केलेला आहे.
वारंवार भाजपच्या वरीष्ठ पातळीवर च्या नेत्या प्रवक्त्यांना गांधीजींच्या मागे लपायला जावे लागते हा भाजपा वर काळाने उगविलेला सूड आहे.
आयुष्य भर कुजबुज चळवळीच्या माध्यमातून गांधीजींना शिव्या दिल्यावर आता त्यांच्या मार्गाने जायचे आहे हे वाक्य जेंव्हा गांधीजी स्वर्गात बसून ऐकत असतील तेंव्हा ते निश्चित हसतील . त्यांचे ते हास्य हे मोनालीसाच्या जगप्रसिद्ध चित्रातील हास्यापेक्षाही सुंदर आणि निखळ असेल.

मोदींच्या चौकीदार मोहिमेमुळे सामान्य माणसाच्या कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याची लोणकढीची थाप राम माधव मारून मोकळे होतात.
हा देश सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धी वर , प्रामाणिक पणावर ,राष्ट्र निष्ठेवर जिवंत आणि प्रगतिशील आहे.  70 वर्षातील देशाची प्रगती सामान्य माणसाच्या असामान्य गुणांमुळे , त्यागा मुळे झाली आहे. त्यात मोदीजींच्या चौकीदार मोहिमेचा दूरदूर मात्र काही संबंध नाही. निरव मोदी, विजय माल्या, ललित मोदी  आणि इतर असेच उद्योगपती नको ते उद्योग करून देशाबाहेर पळाले तेंव्हा "चौकीदार झोपला" होता. , हे सामान्य जनतेने "उघड्या डोळ्यांनी" पाहिले आहे.
मोडीजींनी गुजरात चे मुख्यमंत्री असताना काँग्रेस च्या ज्या योजनांना शिव्यांची लाखोली वाहिली, ज्या योजनांच्या नावाने बोटे मोडली त्याच योजना काहींची नावे बदलून आज त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आहेत. योजना ह्या अभ्यासकरून बनविल्या जातात. गटारातून गॅस काढून त्यावर पकोडे तळणे इतक्या स्वस्त पणे योजना बनत नसतात.

राम माधव म्हणतात जनधन, आधार , मोबाईल ने चित्र पालटले. ह्या तिन्ही पैकी कोणतीही वस्तू मोदींजींनी आणलेली नाही. राजीव गांधींनी संगणक आणला तेंव्हा त्यांच्या नावाने शंख फुकणारे आज डिजिटल इंडियाच्या गप्पा ठोकतात तेंव्हाही नियती हसत असते. 

मोदी सत्तेवर येण्याआधी ह्या देशात जणूकाही शौचालयेच नव्हती असे भासवायचा भाजपचा प्रयत्न असतो.
चंपारण्य सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात मोदीजी म्हणाले होते,  गेल्या आठवड्यात बिहारमध्ये साडेआठ लाख (8.5) शौचालये बांधली.
त्याचा जर हिशेब करायचा म्हंटले तर 1 मिनिटाला 84.31 शौचालये बांधली गेली पाहिजे. हे शक्य होते काय ? जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचे सांगतात त्यातीलच हा प्रकार आहे.
उत्तम संवाद कोशल्य मोदींकडे आहे ही बाब कोणीही नाकारू शकत नाही.
परंतु " उत्तम संभाषण " आणि " सत्य संभाषण " ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सत्य संभाषण हा गुण मोदींजीं कडे दुर्मिळ असावा.

"सबका साथ, सबका विकास" ह्या घोषणेचे जन्मदाते आपणच आहोत हे मोदीजी विसरलेले आहेत.
त्यामुळे ते आता पुलवामा, बालकोट आणि शहिद जवानांच्या नावावर मत मागत फिरत आहेत.  84 पेक्षा जास्त देशांचा दौरा - त्यावर खर्च करणे ,स्वतःच्या जाहिरातींवर जनतेच्या कष्टाच्या पैशाची धूळधाण करून खर्च करणे
ह्या मुळे जनतेला शून्य फायदा झालेला आहे. निरनिराळे साहित्यिक बोजड शब्द वापरून मोदींची प्रतिमा उंचावण्याचे राम माधव ह्यांचे प्रयत्न थीटे पडताना दिसतात. आडात असेल तर पोहऱ्यात येईल ही म्हण काहीतरी अभ्यासा अंतीच बनली असावी .

हुकूमशाह ज्युलियस सीझर चा अंत खूप करूण अवस्थेत झाला.
ज्युलियस सीझर ही एक शोकांतिका आहे. 
भारताच्या पंतप्रधान व्यक्ती साठी आपल्याला ज्युलियस सीझर ची काहीच गरज नाही.  आपण सर्वांना मान देतो व विविधतेचा पुरस्कार करतो. आपला इतिहास जास्त समृद्ध आहे. कृपया मोदींचे कौतुक करताना त्याचा अभ्यास करा.  


धनंजय जुन्नरकर

सचिव, प्रवक्ता मुंबई प्रदेश काँग्रेस.
💐🙏🙏🙏🙏

"मोदीजी" , आप "काम करो" तो जाने !


लोकसत्ता मध्ये 9 एप्रिल 2019 "पहिली बाजू " ह्या सदरा खाली "तुम मुझे मेरे काम से ही जानो " ह्या शिर्षकाखाली भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य श्री.विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे .त्या लेखाला प्रतिउत्तर देणारा काँग्रेस चा लेख .
*************************************

"मोदीजी" , आप "काम करो"  तो जाने !

**************************************

भाजपा उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य श्री.विनय सहस्त्रबुद्धे ह्यांनी मोदींच्या कामगिरी चे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत नाही व इतके औदार्य ही सध्या नाही अशी तक्रार करणारा आणि "मोदी चालीसा" पध्दतीची स्तुती करणारा  लेख लिहिला आहे.

2014 च्या काळात जागतिक पटलावर सत्ता संघर्ष होता व लोकशाही टिकविण्यासाठी जग धडपडत होते अशी माहिती सहस्त्रबुद्धे लिहितात.
2014 साली मोदींनी सत्तेवर येऊन लोकशाही टिकविली असे आडून आडून सुचवितात .  1947 साली भारत आणि पाकिस्तान ह्यांचा जन्म एकाच वेळी झाला आज पाकिस्तानातली नसलेली लोकशाही बघा. मग नेहरूंनी आणि काँग्रेस ने काहीच केले नाही असे बोलायला मोकळे व्हा.

मोदी आणि लोकशाही हे परस्पर विरुद्ध अर्थी शब्द आहेत.
नोट बंदी चा रात्रीतून घेतलेला निर्णय, जीएसटी चा निर्णय , मध्यरात्री सीबीआय संचालक कार्यालयावर धाडी, त्यांची रात्री बदली ही सगळी
 "आदर्श लोकशाहीची" उदाहरणे समजावी काय ?
जनतेच्या विश्वासाला नख लावण्याचे काम मोदी सरकार ने वारंवार केले आहे. त्या मुळे मोदी आणि लोकशाही हे शब्द एकत्र उच्चारले तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते.

2012-2014 च्या काळात काँग्रेस सरकार बद्दल भ्रमनिरास झाल्याचे ते लिहितात. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल बाबा रामदेव ह्यांच्या सक्रिय
 "अ - राजकीय " चळवळी आणि कथित (न)झालेल्या घोटाळ्यांविषयी सहत्रबुद्धे प्रतिपादन करतात. दहशतवादी हल्ले , घटना झाल्याचे सांगून 
निरोगी लोकशाही साठी मोदी उदय झाल्याचे ते ठासून सांगतात. ह्या सर्व बाबींचे अवलोकन केले असता भाजपा आणि आरएसएस  विचारधारे च्या ह्या लोकांनी जनतेला कसे फसविले होते ते उमजले आहे. दिल्लीच्या जंतरमंतर वर मोदी सरकार येण्या आधीची अण्णा हजारे ह्यांच्या उपोषणाला होणारी गर्दी आणि साडेचार वर्षात लोकपाल न आल्यावर पुन्हा केलेल्या आंदोलना नंतर तेथे
 "न झालेली गर्दी " ह्यावरून हजारे ह्यांचे आंदोलन कोण चालवत होते ते जनतेला समजले. 
इंदिरा गांधी ह्यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी जयप्रकाश नारायण ह्यांच्या सभेला ही प्रचंड गर्दी आरएसएस च्या विचारांचे लोक करत होते. नंतर कार्यभाग उरकल्यावर त्यांच्या सभा ओस पडू लागल्या होत्या.हा इतिहास लोकांच्या लक्षात आहे. 
ह्या "अ-राजकीय" की अराजकीय  आंदोलनाचे लाभार्थी  अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. रामदेव बाबा ह्यांची 2012 पूर्वी ची जमीन, संपत्ती आणि 2019 मधील मालमत्ता ह्यांचा हिशोब केल्यावर ही आंदोलने का केली गेली हे लपून राहत नाही. ह्यांच्या आंदोलनांना काही पेड प्रसिद्धी माध्यमांनी किती वेळ दिला व सुपारी घेऊन बातम्या कशा केल्या ? ह्या बाबी पोषक लोकशाहीचे लक्षण आहे काय ? 

"ठाम विचार , निर्धारपूर्वक पाऊले टाकण्याची अजोड क्षमता " वगैरे मोठे मोठे शब्द लिहून  " मोदींना युगपुरुष"  दाखविण्याचा सहस्त्रबुद्धे केविलवाणा प्रयत्न करतात. 
मोदींची ठाम पाऊले गेल्या 5 वर्षात एक पत्रकार परिषद घेण्यासाठी ही कधी उचलली गेल्याचे 130 करोड जनतेने पाहिले नाही. त्यांची पाऊले त्यांच्या उद्योगपती मित्रांना घेऊन त्यांना परदेशी करार करण्यासाठी वारंवार एअरपोर्ट कडे जाताना पाहिली गेली. त्यांची पाऊले सतत निरनिराळ्या राज्यांच्या प्रचार रॅली साठी वारंवार मैदानांकडे वळलेली पाहिली गेली.
"भव्य दिव्य - थिंकिंग बिग " हे मोदींचे शब्द आणि योजना ह्यांचा शून्य उपयोग झाला आहे. काँग्रेस च्या योजनांना आकर्षक नावे देण्या बद्दल मात्र मी भाजपचे अभिनंदन करतो. काँग्रेस ने कामे करण्यावर लक्ष दिले , जाहिराती करण्याचे काम काँग्रेस ला करता आले नाही. कारण "बाते कम काम जादा" हा काँग्रेस चा नारा आहे.

ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून भाजपा 2014 ला सत्तेवर आले त्यात किती लोक जेल मध्ये गेले ?  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांना शेलकी विशेषणे लावून वारंवार अपमान केला गेला. मौनी बाबा, रिमोट कंट्रोल ने चालणारा , "बाथरूम मे रेनकोट पहनकर नहाने वाला" म्हंटलं गेलं. 
 मनमोहन सिंग म्हणाले होते , "अभी की मीडिया की तुलना मे इतिहास मुझसे दयालु रहेगा" . त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन भाजपने केले काय ? 

एका रात्रीत मनमानी करून नोट बंदी केली गेली तेंव्हा ते म्हणाले की 2 टक्के जीडीपी घसरेल व तसेच घडले. अर्थशास्त्री विद्वान लोकांचे अपमान करून भाजपने काय "बिग थिंक " केले कुणास ठाऊक !

मोदी हे कठोर शासकाची प्रतिमा असलेले नेते असल्याचे सहस्त्रबुद्धे लिहितात. परंतु वास्तव वेगळेच जाणवते.
मोदी हे स्वतःच्या च प्रतिमेच्या प्रेमात पडलेली व्यक्ती आहे. त्यांना लोकांनी प्रश्न विचारले ले आवडत नाही, प्रश्नांपासून पळणारा ,समस्यांपासून पळणारा, राष्ट्रभक्तीच्या आड लपून सैनिकांच्या नावाने मतदान मागणारा केविलवाणी अशी व्यक्ती ते वाटतात.

आज भाजपच्या जुमलेबाजी करणाऱ्या संकल्प वजा जाहिरनाम्याचे प्रकाशन झाले. आता मोदी गुजरात मॉडेल च्या गप्पा मारत नाहीत. 2 कोटी रोजगार निर्मिती बद्दल बोलत नाहीत,काळ्या धना बद्दल बोलत नाहीत. 2034 वगैरे पर्यंत इतके इतके लाख कोटी रुपये वगैरे चे मोठे मोठे शब्द फेकतात. जनतेने 5 वर्षा साठी सत्ता दिलेली असते. पुढच्या 50-60 वर्षांच्या गप्पा मारून भ्रामक आकडेवारी ने किती वेळ फसविणार ??
लेखाच्या अंती मोदींची कविता सहत्रबुद्धे लिहितात. 

" तुम मुझे मेरी तसबीर या पोष्टर में ढूंढ़ने की 

व्यर्थ कोशीश मत करो ।

मैं तो पद्मासन की मुद्रा में बैठा हूँ।

आपण अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे अजातशत्रू वगैरे आहोत असे त्यांना वाटत असावे.  स्वतःच्या कविते च्या ओळींशी स्वतः मोदी आणि त्यांचे कथित सहकारी  कशी प्रतारणा करत आहेत हे सगळा देश पाहत आहे.

 मोदी मोदी ही अक्षरे लिहिलेला सूट बनवून घालणे, "नमो टीव्ही" , बॅनर , पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज, सर्व वृत्तपत्रांमध्ये पान भर फोटो असलेल्या जाहिराती , पेन ,लॉकेट,  साड्या सर्वत्र फोटो लावून झालेले आहे.  भारतीय सेनेला "मोदी सेना" म्हणून झाले आहे.  आता फक्त आकाशातील ढगांवर आणि नदी समुद्रातील वाहत्या पाण्यावर मोदींचे फोटो बाकी आहेत. 
त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासना प्रमाणे त्यांची कविताही जुमला ठरावी ,ह्या बद्दल खेद आणि वैषम्य वाटते.
सॉरी सहस्त्रबुद्धे जी तुमची मेहनत वाया गेली .
 बेष्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टाईम !

धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता मुंबई प्रदेश काँग्रेस 

"मै भी चौकीदार "? एक फुकाची वळवळ !


शुक्रवार दिनांक 22 मार्च 2019 रोजी संपादकीय पृष्ठावर , "मै भी चौकीदार " चळवळ ह्या शिर्षकाखाली भाजपा  माध्यम विभागाचे राष्ट्रीय प्रमुख आणि प्रवक्ते अनिल बलुनी ह्यांनी जो लेख लिहिला आहे त्याला प्रतिउत्तर देणारा लेख !

"मै भी चौकीदार "? एक फुकाची वळवळ !

महात्मा गांधी ज्यांच्या "प्रातः स्मरणीय"  लिष्ट मध्ये कधीच नव्हते आणि आयुष्यभर ज्यांनी गांधींचा दुःस्वास  केला, त्या मातृ-पितृ विचार धारेतून आलेल्या भाजपच्या नेत्या प्रवक्त्याना तोंड देखलेपणाने का होईना गांधीजींची उदाहरणे द्यायची पाळी आली ही त्यांच्या साठी शोकांतिकाच आहे.
"मै भी चौकीदार" ह्या लेखात ते बेमालूम पणे महात्मा गांधी ह्यांचे आंदोलन आणि आदरणीय विनोबा भावे ह्यांची 1952 सालची "भूदान चळवळ "ह्यांच्याशी तुलना करून प्रधान सेवक मोदी ह्यांना त्या पात्रते ला नेण्याचा प्रयत्न करतात. पण गांधी आणि भावे ह्यांच्याशी तुलना करायला भाजपात अजून कुणी जन्मलेले नाही, पुढे जन्मायची शक्यता ही दिसत नाही.
मुळात "मै भी चौकीदार" ही चळवळ म्हणायच्या पात्रतेची तरी  वळवळ आहे काय??

मुदलात 2014 ला चाय वाला, गुजरात मॉडेल, अच्छे दिन , मेक इन इंडिया ,स्टार्टअप इंडिया च्या घोषणा कुठे कधी हरविल्या आणि "चौकीदार चोर है " ही घोषणा लोकांनी कशी उचलली ,हे भाजपच्या चाणक्यानां ही कळले नाही.

देश, राष्ट्रवाद , भारतमाता की जय, वंदे मातरम ,ह्या सर्व बाबी, मतपेटीतून विजयाचा मार्ग शोधण्यासाठीच्या युक्त्या होत्या ,हे जनतेला लोकसभेच्या शेवटी शेवटी समजायला लागले आहे. भाजपचे प्रवक्ते अनिल बलुनी ह्यांच्या मते मोदींच्या  "मै भी चौकीदार"
ह्या ट्विट ने क्रांती केली आणि सामाजीक चळवळ उभारली गेली. ज्या पक्षाचे कोटीच्याकोटी सदस्य 
मिस कॉल ने तयार होतात, ज्यांच्याकडे समाजमाध्यमाच्या निरनिराळ्या विभागासाठी  खर्च करायला पैसे आणि टीम आहे त्यांना हे सर्व सहज शक्य आहे.
भाजपच्या एका प्रवक्त्याच्या मते मोदीजी विष्णूचा अवतार देखील आहेत. त्या अर्थाने मोदींजींचा जन्म स्वातंत्रपूर्व झाला असता तर 150 वर्षे लढण्याची गरज देखील नसती. त्यांच्या एका ट्विट ने देखील चळवळ उभी राहिली असती आणि ब्रिटिश सरकार मागे वळून न बघता पळत सुटले असते.

"सबका साथ सबका विकास " ही घोषणा तर सर्वात जास्त ट्रोल झालेली आणि हल्ली तर विनोदांसाठी वापरली जाणारी घोषणा आहे.

भ्रष्टाचार आणि भाजपा हे समानार्थी शब्द आहेत, परंतु काही पेड माध्यमांमुळे लोक विस्मृतीत गेले होते.,ते आता खाडकन जागे झाले आहेत . 
अनिल बलुनी ह्यांचे एक वाक्यातील 3 शब्द आवडले ते म्हणजे " लाल किल्ल्याच्या सदरेवरून ". आपण खूप काही ऐतिहासिक लिहत असल्याचे भाजपच्या बोरू बहाद्दरांना वाटत असते पण ते तसे नाही. "सदर लाल किल्ला ही भाड्याने देऊन नको तिकडे व्यापार दाखवायचा मूर्खपणा मोदी सरकार ने केलेला आहे. एकाच मित्राला 5 एअर पोर्ट भाड्याने दिले तेंव्हा अनुभव पाहिला गेला नाही.

"2014 सबका साथ सबका विकास " ह्या घोषणेचे  "मेरा झूठ सबसे मजबूत" ह्या घोषणेत लोकांनी कधी रूपांतर केले ते भाजपच्या धुरीणींना कळले ही नाही.
रोजगाराचे आकडे जाहीर करायला 56 इंच छाती घाबरते हे जनता बघत आहे. 12,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,रोज शाहिद होणारे जवान , पाकिस्तानला जाऊन केक खाणे,पुलवामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले त्याला महिना झाला नाही तर त्यांच्या पंतप्रधानाला चोरून एसएमएस पाठविणे , ह्या गोष्टींची नोंद जनता घेत नाही असे वाटते काय? 

वर्षाला 2 कोटी नवीन रोजगार राहिले बाजूला , काँग्रेस काळात लागलेल्या 1 कोटीच्या वर नोकऱ्या गेल्या. शेतमजूर घरी बसले. मजुरी द्यायला पैसे नाही. एम टी एन एल च्या कामगारांना ,जेट च्या कामगारांना , छत्तीसगड च्या चौकीदारांना 4 ते 6 महिने पगार मिळत नाहीए. जगात सर्वात मोठा पुतळा सरदार पटेल ह्यांचा बनविण्यासाठी प्रचंड खर्च केला त्या कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत. 70 वर्षात अशी भीषण परिस्थिती आली नव्हती.
जनतेचा 1 रुपयाही संसदेच्या मंजुरी शिवाय खर्च करता येणार नाही, हे लोकशाहीचे तत्व आहे. ह्या तत्वालाही केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.
संसदेच्या मंजुरीशिवाय 99,610 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.कॅग ने यावर ताशेरे मारले आहेत. गोदी मीडियात ह्याची बातमी देखील नाही.अर्थमंत्रालायचे ह्या बाबींकडे दुर्लक्ष आहे.हे जाणीवपूर्वक आहे. जिकडे चौकीदारी करायला पाहिजे तिथे सर्व कथित चौकीदार डोळ्यावर झापडे लावून मूग गिळून बसलेले आहेत.

न्यायाधीश पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकारांचे खून होत आहेत. न्यायाधीश संशयास्पद रित्या मृत्यु मुखी पडले आहेत, केस घ्यायला तयार नाहीत,  खऱ्या बातम्या दिल्या तर ते चॅनल केबल वरून गायब करण्यात येत आहे. संपादकांना घरी बसविले जात आहे. असा भारत कुणी अपेक्षिलेला नाही.

आंनदी देशाच्या क्रमवारीत सतत 3 वर्षे आपला क्रमांक घसरत गेलेला असून 156 देशांच्या क्रमवारीत तो 140 वर गेलेला आहे. आपण 16 जणांच्या पुढे आहोत ह्यात तर मोदींजींना आनंद होत असेल तर आपण काय बोलणार.?
पाकिस्तान चा 67 तर बांगलादेश चा 125 वा क्रमांक आहे. आपण त्यांच्याही मागे आहोत.

नोट बंदीतही हेच केले.4 नोव्हेंबर 2016 पर्यंत 17.97 लाख कोटी रोख रुपये चलनात होते. डिजिटल इंडियाची खोटी जाहिरातबाजी करून लोकांना पुन्हा फसविले. ह्या चलनात आता 19.44 % वाढ झालेली असून 21.41 लाख कोटी रुपये रोख चलन बाजारात उपलब्ध आहे. हजारो नोकऱ्या गेल्या , कारखाने बंद पडले, लायनीत उभे राहून 100 च्या वर मृत्यू मुखी पडले पण चौकीदाराला त्याचे सोयरसुतक नव्हते.
राफेल विमान घोटाळा हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून नोंद केला जाईल अशी चिन्हे आहेत. चौकीदार प्रामाणिक आहे तर संयुक्त संसद समिती का नेमली जात नाही? 

माजी सीबीआय निर्देशक आलोक वर्मा राफेल ची फाईल उघडतील ह्या भीतीने रातोरात त्यांची बदली करणे, न्यायालयाला शपथेवर खोटे सांगणे  देशाच्या महत्वाच्या संस्थांना बटीक बनवून टाकणे हे काही लपवून ठेवण्या सारखे नाही.

हाय प्रोफाइल 2 जी घोटाळ्याचे खोटेपण लोकांना समजले आहे. तत्कालीन ए. राजा समवेत 17 आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडलेले आहे.
भाजपा आणि मोदी सरकार ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झालेली आहे.
सतत नवीन घोषणा देणे , कुणी सरकार ला प्रश्न विचारले तर राष्ट्रवादी घोषणा देणे, त्याला देशद्रोही म्हणणे हेच गेले 4 साडेचार वर्षे लोक बघत आलेले आहेत.
हे आता जास्त दिवस चालणार नाही.
 मतदारांमध्येही एक गावरान शहाणपणा असतो, तेथे वारंवार चाणक्य नीती चालत नाही. 
"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" ही घोषणा मोदी सरकार ला माहीत नसावी . लोकांना माहीत आहे.
मोदीजी अखलाक च्या मृत्यु वर ,नजीब च्या गायब होण्यावर , दलितांना झाडाला टांगून मरेस्तोवर मारण्यावर ,झुंडशाही ने विशिष्ट समाजाच्या लोकांच्या हत्या होण्यावर काहीच ट्विट करत नाहीत.
 त्यावर ट्विट करून काही चळवळ उभारल्याचे आम्ही कुठेही पाहिले नाही.
गांधीजींच्या 71 व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर बंदुकेने गोळ्या झाडणाऱ्या साध्वी चे दर्शन जगाने घेतले. त्यावेळी "मै मोहनदास गांधी " असे ट्विट करणे आणि चळवळ उभी करणे ह्याची इच्छा प्रधान सेवकांना झाली नाही. तेही देशाने पाहिले आहे. 
आज जर गांधींचा खून गोडसेने केला असता तर तो पुराव्याअभावी नक्की सुटला असता आणि लोकसभा लढविण्यार्यांच्या यादीत त्याचे नावही दिसले असते.
असो.
कितीही प्रयत्न केला तरी, "चौकीदार चोर आहे " ही घोषणा विस्मृतीत जाणार नाही आणि त्यापासून भाजपाला पळताही येणार नाही हेच सत्य आहे.

- धनंजय जुन्नरकर
सचिव, प्रवक्ता -टिव्ही पॅनलिस्ट
मुंबई प्रदेश काँग्रेस 
9930075444

Show quoted text

Thursday, 28 March 2019

Journalist-View: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज...

Journalist-View: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज...: सार्वजनिक गणेशोत्सव ,उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाचा धोरण लकवा                                                                  ...