Saturday, 14 March 2015

फळांचा राजा आणि ग्राहक राजा --एक गोड रसाळ संघर्ष

 फळांचा राजा आणि ग्राहक राजा --एक गोड रसाळ संघर्ष 
     धनंजय जुन्नरकर 

किरकोळ व्यापाऱ्यांचे व आंबा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपले प्रश्न नाहीत ही भूमिका घेऊन चालणार नाही . कारण उद्या पिकवणारे अस्तित्वात राहिले नाही तर ग्राहक हि संकल्पना आपोआप संपुष्टात येईल . त्यामुळे त्यांचे प्रश्नही आपण समजून घेतले पाहिजे . शासनाने देखील फळांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हंगाम सुरू होण्याआधीपासून प्रयत्न केले पाहिजेत . तालुका-जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांच्या -व्यापाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत . निरनिराळ्या देशांचे हवामान , त्यांचे फळे आयात करण्याचे निकष व त्याबाबतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावले पाहिजे . कृषी विभाग - जिल्हा बँक - मान्यताप्राप्त प्रयोग शाळा -निर्यात विभाग ह्यांना एका छता खाली आणले पाहिजे . शेतकऱ्यांना सदर महिती-तंत्रज्ञान -व अनुदान  देताना ग्राहकांना देखील जागरूक केले पाहिजे . कारण आंबा हा फळांचा राजा असला तरी लोकशाहीत ग्राहक हाही राजाच आहे . एकाराजाचे वर्तन दुसऱ्या राजाशी राजा प्रमाणेच व्हायला पाहिजे तरच राजाची देखील शान राहील !  



आंब्याच्या हंगाम सुरू झाला असला तरी भाव परवडण्या साठीची सामन्यांची परवड काही थांबलेली नाही . अन्न व औषधे प्रशासनाकडून पडणाऱ्या धाडी मुळे आंबा व्यापाऱ्यांमध्ये दहशत आणि नाराजी देखील आहे. कॅल्शियम कार्बाइड च्या मदतीने आंबा जबरदस्तीने पिकवला जात आहे . कमी वेळात जास्तीत जास्त मालाची विक्री करावी या हेतूने सदर बाबी होत आहे . निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक प्रक्रियेने आंब्यावर चे साल -गर ह्यांना पिकण्या च्या कालावधी पर्यंत पोहचूच  दिले जात नाही . टप्प्या टप्प्या ने ज्या गोष्टी होत असतात त्यांना त्या क्रमाने होऊ  दिल्या तर होणाऱ्या प्रुथक्करणा नंतर जीवन सत्व , पौष्टिकता  व चव ह्याचा आस्वाद घेत येतो . परंतु पैसे कमविण्याच्या नादात हे टप्पे गाळून  " पि हळद आणि हो गोरी  " ह्या तत्वा प्रमाणे हिरव्या आंब्याला पिवळा करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो . 
मानवी शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळण्यासाठी सकस अन्न आणि तेवढीच कसदार फळे खाणे आवश्यक आहे . नैसर्गिक रित्या पिकवलेल्या फळांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात . त्यांच्या सल्ल्याने फळे खायची म्हटली जबरदस्तीने पिकवलेल्या फळांमुळे विकतचे आजारपण अंगावर घावे लागत आहे . पैसे देणाऱ्या ग्राहकाला योग्य मोबदला मिळण्याच्या प्रामाणिक हेतूने अन्न व औषध प्रशासन काम करत आहे . महेश झगडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची टिम काम करत आहे . 
जे व्यापारी  कॅल्शियम कार्बाइडचा वापर करतात त्यांच्या म्हणण्या प्रमाणे शतकानुशतके आंबा पिकविण्यासाठी  कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे . आंबा खाऊन कुणाचा मृत्यू झाला अशी बातमी आपण ऐकली आहे काय ? सतत विकसित होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञाना  मुळे रोज नव्या गोष्टी शिकायला मिळतात  व समजून येतात . निरनिराळ्या सायंटिफिक जर्नल्स मध्ये प्रसिध्द झालेले संशोधन - प्रयोग  ह्यामुळे हाती आलेल्या महिती नुसार  कॅल्शियम कार्बाइडच्या माध्यमातून पिकवलेली फळे खाल्ल्याने दूरगामी परिणाम होतात . मोठे आतडे ,फुफ्फुस, गर्भाशय ह्यावर कार्बाइडचा वाईट परिणाम होतो . प्रसंगी कॅन्सर देखील होतो . कार्बाइडमुळे तयार होणाऱ्या ग्यास मध्ये फोस्फीन -आर्सेनिकचे  प्रमाण असते . त्यामुळे चक्कर येणे ,उलटी होणे ,- पोटाचे विकार होतात . गरोदर बायकांना याचा त्रास होतो . आपल्याला याची कल्पना येत नाही . आपल्याला वाटते जास्त जागरण झाले असावे , पित्त झाले असावे , खाण्यात काहीतरी चुकीचे आले असावे , त्यामुळे त्रास होत असावा . 
ह्यासार्व बाबी आंबा व्यापाऱ्यांशी चर्चिल्या असता त्यांच्या मते तंबाखू खाऊन देखील कॅन्सर होतो , दारूने लिव्हर खराब होते त्यावर सरकारने आधी बंदी आणावी मग व्यापाऱ्यांना कार्बाइड वापरापासून परावृत्त करावे . ज्यांच्या साठी आपण पिक लावतो , ज्यांच्याकडून आपण पैसे कमावणार आहोत त्यांच्या आरोग्याबाबत आपली जबाबदारी झटकणारे हे काही व्यापाऱ्यांचे विधान निराशाजनक आहे . 
आंबा व त्याच्या निरनिराळ्या जातींपैकी म्याक्सिकन आंबा आणि बदामी आंबा हे झाडावरच पिकतात . साधा आंबा पिकण्यसथी तज्ञांच्या मते 3 5 डिग्री तापमान आवश्यक आहे. त्यानंतर आपोआप इथेनील ग्यास ची निर्मिती होउन आंबा पिकतो .  इथेनील ग्यासचा वापर करून आंबा पिकविण्यात यावा आसे शासनाचे परिपत्रक आहे . जसे अंड्याचे कृत्रिम उबवणी केंद्र असते तसे कृत्रिमरीत्या परंतु शरीराला हानी होणार नाही असे तंत्र विकसित झाले आहे . त्याला राय पानिंग चेंबर म्हणतात . राय पानिंग चेंबर आणि ग्यास प्रक्रिया करणारी संयंत्रे आंबा पिकविण्यचे काम करत आहे . परंतु पुरेशा प्रमाणात यांची उपलब्धता नसल्याने व हे यंत्र उभारण्याचा खर्च लाखात असल्याने कॅल्शियम कार्बाइड च्या पुड्या वापराकडे व्यापारी वळतात . इथेनील ग्यास मुळे आंबा पिकतो हे तंत्र किरकोळ व्यापाऱ्यांना ठाऊक देखील नाही . व्यापाऱ्यांच्या मते जो आंबा आम्ही विकतो तोच आंबा आम्ही देखील खातो . आम्हाला काही झालेले नाही , त्यामुळे लोकांनी घाबरायचे कारण नाही . या युक्तिवादाला शास्त्रीय आधार नाही 
आंबा निर्यात करण्याच्या संदर्भातील नियम जागतिक स्तराचे व काटेकोरपणे अंमलबजावणी केले जाणारे आहेत . किटक नाशके ,खते , माती - पाणी परीक्षण -जड मुलद्रव्ये यांच्या बाबतचे निकष तंतोतंत पाळले जातात . शेतकऱ्यांच्या - व्यापाऱ्यांच्या हिता  साठी ग्राहकांचे हित बाजूला ठेवले जात नाही . मोठे व्यापारी सर्व निकषांचे पालन करत निर्यात करतात , चांगला नफा कमावतात . परंतु ,देशात हा माल विक्रीसाठी उपलब्ध करताना किती व्यापारी देशातील ग्राहकांचा विचार करतात हा संशोधनाचा विषय आहे . 
हंगामात चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा आंबा मुंबईत आणला जातो . पैकी 6 5 ते 7 0 टक्के आंबा कोकणातून येतो . कोकणात कंत्रा ट पद्धतीने आंबा विक्रीचा व्यवसाय होत असल्याने नक्की कोण व कोणत्या टप्प्यात कॅल्शियम कार्बाइड चा वापर करतो हे सांगणे अवघड आहे . कॅल्शियम कार्बाइड चा वापर करणाऱ्यांवर धाडी पडू लागल्याने - कारवाई होऊ लागल्याने व लोक आरोग्य बाबत जागरुक व्हायला लागल्याने व्यापार्यांनाही आता बदलावे लागेल . पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी निरनिराळे प्रयोग करून ऊस - द्राक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक रित्या व सहकाराची कास धरून सधन झाला . कोकणात मात्र या सर्व बाबींचा अभाव जाणवतो . पिढीजात आंब्याचा व्यवसाय करणारी व प्रसिध्द असणारी दोन चार नावे सोडली तर मनी ओर्डर वर जगणारा प्रदेश ही ओळख अजुनही कोकणाला पुसून टाकता आली नाही ह्याचे वैषम्य वाटते . 
हापूस आंबा कसा ओळखावा किमान  कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकवलेला आंबा कसा ओळखावा हे प्रयत्नांनी उमजणारे तंत्र आहे . जबरदस्तीने पिकवलेल्या फळांचे देठ हिरवे राहून फळ मात्र पिवळे होते . ही फळे लवकर काळी पडतात व सडतात देखील लवकर . ओळखीच्या माणसाकडून घेतलेला आंबा स्वच्छ धुवून पुसून खाणे हेच सध्यातरी आपल्याला जमणारे आहे . 

किरकोळ व्यापाऱ्यांचे व आंबा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपले प्रश्न नाहीत ही भूमिका घेऊन चालणार नाही . कारण उद्या पिकवणारे अस्तित्वात राहिले नाही तर ग्राहक हि संकल्पना आपोआप संपुष्टात येईल . त्यामुळे त्यांचे प्रश्नही आपण समजून घेतले पाहिजे . शासनाने देखील फळांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हंगाम सुरू होण्याआधीपासून प्रयत्न केले पाहिजेत . तालुका-जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांच्या -व्यापाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत . निरनिराळ्या देशांचे हवामान , त्यांचे फळे आयात करण्याचे निकष व त्याबाबतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावले पाहिजे . कृषी विभाग - जिल्हा बँक - मान्यताप्राप्त प्रयोग शाळा -निर्यात विभाग ह्यांना एका छता खाली आणले पाहिजे . शेतकऱ्यांना सदर महिती-तंत्रज्ञान -व अनुदान  देताना ग्राहकांना देखील जागरूक केले पाहिजे . कारण आंबा हा फळांचा राजा असला तरी लोकशाहीत ग्राहक हाही राजाच आहे . एका राजाचे वर्तन दुसऱ्या राजाशी राजा प्रमाणेच व्हायला पाहिजे तरच राजाची देखील शान राहील !  

No comments:

Post a Comment